जनतेला स्वप्ने दाखवणारे नेते चांगले वाटतात : गडकरी

मुंबई नगरी टीम 

मुंबई : जनतेला स्वप्ने दाखवणारे नेते चांगले वाटतात परंतु त्यांनी दाखवलेली स्वप्न आणि आश्वासनांची पूर्तता झाली नाही की, तेच लोक या नेत्यांची धुलाई करतात, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप प्रणित राष्ट्रीय  नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात अभिनेत्री ईशा कोपीकर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

भाजपने राष्ट्रीय स्तरावरच्या वाहतूक संघटनेची घोषणा करत शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. षण्मुखानंद सभागृहात झालेल्या सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप प्रणित राष्ट्रीय स्तरावरच्या नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी अभिनेत्री ईशा कोपीकरने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सोहळ्याला संघटनेचे प्रमुख आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आ.आशिष शेलार, खासदार अमर साबळे, आमदार कॅप्टन तमिळ सेलव्हन, जमाल सिद्धिकी हे उपस्थित होते.

जनतेला स्वप्ने दाखवणारे नेते चांगले वाटतात परंतु त्यांनी दाखवलेली स्वप्न आणि आश्वासनांची पूर्तता झाली नाही की, तेच लोक या नेत्यांची धुलाई करतात असे वक्तव्य करतानाच,वाहतुकदारांनी सुरक्षित, फायदेशीर, प्रदूषण मुक्त वाहतूक करावी, यासाठी भाजप सरकारने नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून बदलत्या युगात नवनवीन पर्यायांचा वापर करत इंधन बचतीकरता मिथेनोल, ई-वाहने, सागरी जलवाहतूक यावर भर देण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे यावेळी  गडकरी आपल्या भाषणात म्हणाले.  हाजी अरफात शेख हे वाहतूक सेनेचे अध्यक्ष होते. मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपद देण्यात आले. भाजपने आता या संघटनेची घोषणा करत सेनेवर कुरघोडी केली आहे, अशी चर्चा आहे. माझ्यासाठी हा अत्यंत अविस्मरणीय आणि महत्वाचा क्षण असून, मी वाहतुकदारांसाठी पूर्वीही लढत होतो आताही लढतो आहे आणि भविष्यातही अखेरपर्यंत लढत राहीन असे अराफत म्हणाले.

Previous articleमाझ्या प्रकरणात हॅकरवर विश्वास का ठेवला : एकनाथ खडसे
Next articleमुख्यमंत्री… उच्च शिक्षित बेरोजगार तरूणांना पकोडे तळायला सांगु नका: मुंडे