शेतकऱ्यांना अनुदानाची घोषणाही फोलच ठरणार :  शिवसेना

मुंबई नगरी टीम

 मुंबई: मुखपत्रातील अग्रलेखातून भाजपला झोडपण्याचे सत्र शिवसेनेने सुरूच ठेवले असून शेतकरी अनुदानाच्या घोषणेवरून आज भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे.राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीची घोषणा सरकारने केली आहे.मात्र सरकारचा इतिहास पाहता ही घोषणाही फोलच ठरण्याची शक्यता आहे.मात्र बोले तैसा चाले असे न झाल्यास जनता नेत्यांना झोडपून काढते,हा दाखला नितीन गडकरींनीच दिला आहे,असा टोला शिवसेनेने अग्रलेखातून दिला आहे.

राज्यातील १५१ दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना २९०० कोटी रूपयांची मदत दिली जाणार आहे.ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.मात्र यापूर्वीही अशा अनेक घोषणा सरकारने केल्या,पण त्या फोल ठरल्या.ही घोषणाही अशीच फोल ठरेल,अशी शंकाही शिवसेनेने व्यक्त केली आहे.काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी नेत्यांनी आश्वासने पूर्ण केली नाही तर जनता झोडपून काढते,असे म्हटले होते.त्याचा उल्लेख करून शिवसेनेने सरकारला जनतेने झोडपून काढावे,असे अप्रत्यक्ष आवाहन केले आहे.

अनुदानाच्या घोषणेवरून सरकारचे कौतुकही केले असून हा चांगला निर्णय असल्याचे म्हटले आहे.ही घोषणा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल,अशी आशा अग्रलेखात शिवसेनेने व्यक्त केली आहे.सरकारची खरी कसोटी उन्हाळ्यात सुरू होणार असून त्यावेळी दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढलेली असेल.त्यावेळी सरकार काय करणार,असा सवाल शिवसेनेने केला आहे.३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार असे सरकारने म्हटले होते.पण ती घोषणा फोल ठरली.कर्जमाफी,शेतमालाला हमीभाव अशा घोषणाही फोलच ठरल्या.या घोषणेचे काय होणार असे विचारतानाच गडकरींचे सूत्र वापरण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

Previous articleमागासवर्गीय उद्योजकांसाठी केंद्र शासनाची स्टँड अप इंडिया योजना
Next articleढोबळेंना तिकीट दिल्यास बनसोडे राष्ट्रवादीत जाणार ?