सरकारला केवळ उद्योगपतींची चिंता : अण्णा हजारे

मुंबई नगरी टीम

अहमदनगर: केंद्र आणि राज्य सरकारला फक्त उद्योगपतींची चिंता आहे.हे सरकार आंधळे आणि बहिरे आहे.त्यांना शेतकऱ्यांचे हाल दिसत नाहीत.त्यांचा टाहो ऐकायला येत नाही.स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करण्याच्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे,असा घणाघाती हल्ला आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर चढवला.लोकपाल,लोकायुक्त कायद्याची अमलबजावणी आणि शेतमालाला दीडपट भाव मिळावा या मागण्यांसाठी आजपासून अण्णांनी उपोषणास सुरूवात केली. यावेळी त्यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली.

अण्णा म्हणाले की,सरकारला भ्रष्टाचारमुक्त देश नकोच आहे.म्हणून तर लोकपाल कायदा लागू केला जात नाही.राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिर परिसरात अण्णा उपोषणास बसले असून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जमले आहेत.लोकपाल कायदा झाल्यावर एक वर्षाच्या आत लोकायुक्त कायदा करावा,अशी तरतूद आहे.पण चार वर्षात सरकारला कायदा करता आला नाही,असे अण्णा म्हणाले.सरकारने उद्योगपतींचे २५ लाख कोटींचे कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही,अशी टीकाही केली.शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन,कर्जमाफी आदी मागण्याही त्यांनी केल्या आहेत.

अण्णा हजारे यांचे उपोषण आधीच संकटात असलेल्या भाजप सरकारसमोर बिकट समस्या आहे.विरोधक त्याचा राजकीय मुद्दा बनवणार हेही उघड आहे.पण अण्णांनी कॉंग्रेस सरकारवरही असेच आरोप करत उपोषण केल्याने कॉंग्रेस याप्रकरणात सावधपणेच उतरेल.

Previous articleभाजपला माजी मुख्यमंत्र्यांचा छळ करायचा आहे ? : संजय निरूपम
Next articleकॅांग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षांना ७ जागा सोडणार ?