मुंबई नगरी टीम
मुंबई : बिग बॉसच्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आता राजकारणाच्या पडद्यावर झळकण्याचे ठरवले आहे.मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांच्या उपस्थितीत तिने आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.
भाभीजी घर पर है या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा प्रसिद्धीच्या झोतात आली होती.बिग बॉसच्या दहाव्या पर्वात ती आल्यावर अनेकांची पसंतीची ठरली होती.हीना खानसोबत युद्धात तिचे पारडे नेहमीच जड राहिले.अखेर शिल्पा दहाव्या पर्वाची विजेती म्हणूनच बाहेर पडली.
ऐन निवडणुकीच्या हंगामातच शिल्पा शिंदे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत उतरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी भविष्यात आपण निवडणुक रिंगणात उतरणार असल्याचे सुतोवाच तिने यावेळी केले. भारताचे आगामी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांना पाहायचे असल्याचेही त्या म्हणाल्या. शिल्पा शिंदे यांच्या लोकप्रियतेचा लाभ कॉग्रेसला नक्कीच होऊ शकतो.शिल्पा मराठी असूनही उत्तर भारतीयांमध्ये लोकप्रिय आहे.कॉंग्रेसचा मोठा मतदार उत्तर भारतीय असल्यानेही कॉंग्रेसला शिल्पाचाराजकीय फायदा होणार आहे.शिल्पा शिंदे आणि वाद यांचे नातेही जुनेच आहे.मराठी कलाकार कामे चांगली करतात पण त्यांना अहंकार जास्त आहे,असे जाहीर वक्तव्य तिने करून वाद ओढवून घेतला होता. तसेच ती अगदीच अव्यावसायिक असल्याची तक्रार निर्माता बिनफेर कोहलीने केली होती.शिल्पा आता नव्या इनिंगमध्ये यशस्वी होते का त्याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.