मिलिंद देवरांचा निवडणुकीतून माघार घेण्याचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई: कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे कॉंग्रेसचे नेते माजी खासदार मिलिंद देवरा संतप्त झाले आहेत.कॉंग्रेसची परिस्थिती पाहता मला लोकसभा निवडणूक लढवण्याचा फेरविचार करावा लागेल,असा इशाराच त्यांनी आज ट्विट करून दिला आहे.यामुळे कॉंग्रेसची अतर्गत लाथाळी समोर आली आहे. तसेच देवरांनी राजकारणातून निवृत्त व्हावे लागेल,असेही म्हटले आहे.

त्यांच्या या ट्विटमुळे मुंबई कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.देवरा म्हणतात की,पक्षांतर्गत गोष्टींची जाहीर वाच्यता करण्याची इच्छा नाही पण एका मुलाखतीतील टिप्पणीमुळे  मुंबईतील विविधतेचे प्रतीक म्हणून कटिबद्ध असलेल्या कॉंग्रेसबाबत आपली निष्ठा राखण्यासाठी या गोष्टीचा पुनरूच्चार केल्याशिवाय इलाज नाही.

मुंबई कॉंग्रेसमधील गटबाजीसंदर्भात देवरांनी हा टोला लगावला आहे.एकमेकांविरोधात लढणाऱ्या नेत्यांसाठी मुंबई कॉंग्रेस हे क्रिकेटचे मैदान होऊ शकत नाही,असा संतापही मिलिंद देवरांनी व्यक्त केला आहे.मुंबई कॉंग्रेसमधील घडामोडींमुळे आपण नाराज आहोत,असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत माझा पवित्रा पक्षाला माहीत आहे आणि केंद्रीय नेतृत्वावर माझी निष्ठाही आहे,असे त्यांनी म्हटले आहे.मुंबई कॉंग्रेसमधील सर्व नेत्यांनी टीम म्हणून एकत्र यावे,असे आवाहन मिलिंद देवरांनी केले आहे.अशीच परिस्थिती राहिली तर निवडणुकीतून माघार घ्यावी लागेल आणि राजकारणातूनही निवृत्ती घ्यावी लागेल,असे उद्विग्न होऊन त्यांनी लिहिले आहे.पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपल्या भावना पोहचवल्याचे त्यांनी नमूद केले आहे.देवरांच्या ट्विटमुळे मुंबई कॉंग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावरच अनेक नेते नाराज आहेत.

Previous articleमाजी मंत्री रविशेठ पाटील यांचा भाजपात प्रवेश
Next articleकार्यक्रम राष्ट्रवादीचा उपस्थिती भाजपच्या नेत्यांची !