कार्यक्रम राष्ट्रवादीचा उपस्थिती भाजपच्या नेत्यांची !

मुंबई नगरी टीम

बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.आज त्याचा पुरावाच मिळाला असून क्षीरसागर बंधुंच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस आंणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या उपस्थित राहणार आहेत.विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या बॅनरवर कुठेही विधानपरिषदेतील नेते धनंजय मुंडे यांचे छायाचित्र नाही.धनंजय मुंडे यांना जयदत्त क्षीरसागर यांनी खुले आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.यातून मुंडे यांना शह बसणार असून सुरेश धस यांच्यानंतर आणखी एक शक्तीशाली नेता भाजपला मिळण्याची शक्यता आहे.

हा कार्यक्रम राष्ट्रवादीचा असला तरी उपस्थिती भाजप नेत्यांची आहे.या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर आणि बॅनरवर धनंजय मुंडे यांचे नावही नाही.बीडमध्ये आज झालेला हा कार्यक्रम राष्ट्रवादीचा होता कारण राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधु नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी आयोजित केला होता.मात्र या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या एकाही स्थानिक नेत्याला निमंत्रण देण्यात आलेले नाही.मुख्यमंत्री स्वत: बीडमध्ये त्यासाठी आले.पंकजा मुंडे यांची विशेष  उपस्थिती असणार होती.पण आगळी गोष्ट म्हणजे भाजपच्या जिल्ह्यातील सर्व आमदारांना निमंत्रण दिले असून त्यांचीही छायाचित्रे बॅनरवर झळकली आहेत.

विनायक मेटेही याच जिल्ह्यातील आहेत.पण पंकजा मुंडे? मेटेंशी दुरावा ठेवला आणि क्षीरसागर यांच्याशी जमवून घेतले,अशी चर्चा नेहमीच होती.जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये आले तर पंकजा मुंडे या एका दगडात दोन पक्षी मारतील.क्षीरसागर यांचे धनंजय मुंडे यांच्याशी पटत नसल्याने ते नाराज होते.त्यांना पक्षात डावलण्यात येत होते.शिवाय जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये आल्यावर विनायक मेटे यांचे महत्व आपोआपच कमी होईल. धनंजय मुंडे यांना शह देऊन पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे,अशीही चर्चा आहे.

Previous articleमिलिंद देवरांचा निवडणुकीतून माघार घेण्याचा इशारा
Next articleषड्यंत्र करणे गडकरींचा स्वभाव नाही : मोहन भागवत