मुंबई नगरी टीम
मुंबई : घाटकोपर येथिल चिरागनगर मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सुमारे अडीच एकरच्या जागेत भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, या स्मारकाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दिलीप कांबळे, उपाध्यक्ष मधुकर कांबळे आणि सदस्य उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे चिरागनगर घाटकोपर येथे वास्तव्य असेलेले घर हे स्मारक म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडाच्या माध्यमातुन उभारण्यात येणार आहे.आजच्या बैठकीत हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी एकूण साडे चार हेक्टर जमिन असून, एका हेक्टरवर स्मारक उभारले जाणार आहे. अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य असलेल्या निवासस्थाच्या परिसरात ७०० घरे आहेत. या ठिकाणच्या परिसराचा विकास हा सरकारच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे.या स्मारकासाठी लागणारा निधी सरकार देणार असून, येत्या अर्थसंकल्पात तशी तरतुद केली जाईल अशी माहिती राज्यमंत्री कांबळे यांनी दिली.
स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. या स्मारकामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा भव्य पुतळा,सुसज्ज ग्रंथालय, सभागृह आणि अभ्यासिका असणार आहे. या स्मारकाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असेही राज्यमंत्री कांबळे यांनी सांगितले.