मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नावांवर आज झालेल्या बैठकीत शिक्का मोर्तब झाला असून, लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे माढा मतदार संघातून निवडणुक लढविणार असल्याचे जवळ जवळ निश्चित मानले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज संसदीय कार्यसमितीची महत्वपूर्ण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली . या बैठकीस छगन भुजबळ , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,अजित पवार ,रामराजे नाईक निंबाळकर ,सुनील तटकरे ,गणेश नाईक ,सुप्रिया सुळे ,दिलीप वळसे पाटील ,धनंजय मुंडे ,विजयसिंह मोहिते पाटील ,अनिल देशमुख ,राजेंद्र शिंगणे ,सचिन अहिर , नवाब मलिक ,हेमंत टकले,संजय खोडके आदी नेते उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत काँग्रेसबरोबर आतापर्यंत जागा वाटपाबाबत झालेल्या वाटाघाटी, राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारे मतदारसंघ, तसेच काही जागांवरून निर्माण झालेला पेच आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावी अशी इच्छा यापूर्वी व्यक्त करण्यात आली होती. त्यावर आज झालेल्य बैठकीत चर्चा झाली. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह केला आहे. कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवतील, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. तर आज झालेल्या बैठकीत काही महत्वाच्याउमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून, अंतिम नावंची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती पटेल यांनी देवून, लोकसभा निवडणुकीत महाआघाडी किमान ३५ जागा जिंकेल असा दावाही त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आजच्या बैठकीत महाआघाडीचा मसुदा काय असावा यावरही चर्चा करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. मतांची विभागणी टाळण्यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्यास आजच्या बैठकीत सहमती झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्चित झाली आहे. तसेच अन्य घटक पक्षांशी चर्चा सुरु असल्याची माहिती पवार यांनी देवून राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.