मुंबई नगरी टीम
मुंबई: राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी बरोबर निवडणूक लढवत असून,रासपची राज्यात आणि देशात ताकद वाढली असल्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने रासपला बारामती, माढा,परभणी, हिंगोली, अमरावतीसह एकूण सहा जागा द्याव्यात अशी मागणी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे काम सुरु आहे.शेतक-यांच्या खात्यावर सरकारी योजनेचे पैसे थेट जमा करण्यात येत आहेत. राज्यात मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. सवर्ण समाजाला आरक्षण देऊन खुश केले आहे. जलयुक्त शिवारची कामे चांगली झाली आहेत. दुधाला सरकारने ५ रुपये अनुदान दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचीच सत्ता येणार असल्याचे महादेव जानकर यानी सांगून, रासपला बारामती, माढा,परभणी, हिंगोली, अमरावतीसह एकूण सहा जागा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे माढा लोकसभा मतदार संघातन लोकसभा निवडणूक लढविणार आहेत यावर प्रतिक्रिया देताना जानकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शेवटच्या घटका मोजत आहे.त्यामुळेच पवार यांच्यावर या वयात निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत येत्या २४ फेब्रुवारीला शिवाजी पार्क मैदानावर राष्ट्रीय समाज पक्षातर्फ महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. या मेळाव्याला राज्यातील नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे.