मुंबई नगरी टीम
मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे. हा देशावरील हल्ला आहे. जरी आमचा पक्ष वेगळा असला तरी हा देशाचा आणि राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने आम्ही दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकार सोबत आहोत. आपली सुरक्षा यंत्रणा या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम असून त्यांनी या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. पुलवामा येथे पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आज मुंबई काँग्रेस कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, काल पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला हा या देशावरील हल्ला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे ज्यात ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले आहेत. या सर्व जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या भ्याड हल्ल्याविरोधात संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण आहे. दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणा-या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज असून दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये काँग्रेस पक्ष सरकारसोबत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यावेळी असे म्हणाले की, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे ४४ जवान शहीद झाले आहेत. त्यांना मी मुंबई काँग्रेसतर्फे श्रद्धांजली अर्पण करत आहे. आपल्या देशाचे संरक्षण करताना त्यांनी आपल्या जिवाचे बलिदान दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, याची मला खात्री आहे. पाकिस्तानकडून जो दहशतवाद पसरवला जातोय त्याचा बिमोड करण्याची आज गरज निर्माण झाली आहे आणि दहशतवादाविरोधात सरकार जी कारवाई करेल, त्यासाठी आम्ही सरकार सोबत आहोत. यामध्ये कोणतेही राजकारण करण्याचे गरज नाही, कारण हा संपूर्ण देशाचा विषय आहे.