मुंबई नगरी टीम
सांगली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन वीर शहीद झाले आहेत.या हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातील जवानांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत करून कुटुंबियाचे पुनर्वसन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तासगाव येथे केली आहे.
पुलवामा येथे झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध केला जावा तेवढा थोडा आहे. सगळ्या जनतेच्या मनात या हल्ल्याचा राग आहे. जे जवान या हल्ल्यात शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतःला एकटे समजू नये. सव्वाशे कोटी जनता तुमचे कुटुंब आहे हे लक्षात असूद्या, कोणतीही काळजी करू नका असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शहीद जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही, या हल्ल्याला आम्ही जशास तसे उत्तर देणार असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रातील संजय राजपुत आणि नितीन राठोड हे दोन जवान शहीद झाले आहेत. या महाराष्ट्रातल्या दोन जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. आर्थिक मदत जाहीर करताना पुनर्वसनाची काळजी घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.