भाजप शिवसेना युतीने दलितांचा अपमान केला : रामदास आठवले
मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजप आणि शिवसेना युतीच्या जागावाटपात लोकसभेसाठी भाजप २५ आणि शिवसेना २३ असे सूत्र ठरले. मात्र आरपीआयला एकही जागा न सोडल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले चांगलेच नाराज झाले आहेत. आरपीआयला एकही जागा न सोडणे हा दलित समाज, आरपीआय आणि माझा देखील अपमान केला आहे,या शब्दांत आठवले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आठवले म्हणाले की,आमची उपेक्षा केली गेली आहे. त्यांनी याबाबत नक्की विचार केला पाहिजे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आमच्याशी संपर्क केला आहे, अशी गर्भित धमकी द्यायलाही आठवले विसरले नाहीत. आपण पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राहू इच्छितो,अशी सारवासारव त्यांनी लगेचच केली.भाजप आणि शिवसेनेने एकही जागा आम्हाला दिली नाही तर माझ्या पक्षाला पुढे नेण्याच्या रणनीतीवर विचार करावा लागेल,असे आठवले म्हणाले.
भाजप आणि शिवसेना यांनी सर्व जागा वाटून घेतल्याने आठवले यांची अडचण झाली आहे. त्यांना युतीचा संताप आला असला तरी सांगणार कुणाला,अशी त्यांची अवस्था झाली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ आपल्याला सोडावा,असा आग्रह त्यांनी धरला.पण त्यांच्या मागणीला आतापर्यंत वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. आरपीआयची समजूत आता कशी काढली जाते,याची उत्सुकता आहे.