मग सरकार तेव्हा खोटे बोलले का ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत यायला निघालेल्या नाशिकच्या शेतकऱ्यांना सरकारने युक्तीने मुंबईत येण्यापासून रोखले. गेल्या वर्षी हे शेतकरी मुंबईत आले तेव्हा त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत,असे सांगितले गेले. तरीही नाशिकचे शेतकरी पुन्हा का येत होते,असा सवाल काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे.
नाशिकच्या किसान लॉंग मार्चला मुंबईत येण्यापासून रोखण्यात सरकार यशस्वी झाले. मात्र यावरून निरूपम यांनी सरकार मग गेल्या वर्षी खोटे बोलले का,असा सडेतोड सवाल केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून सरकारवर टीका केली आहे.नाशिक येथील शेतकऱ्यांचा किसान लॉंग मार्च गेल्या वर्षी मुंबईवर धडकला होता. तेव्हा सरकारची धावपळ उडाली होती. आता निवडणूक असल्याने शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फटका बसू शकतो,याची कल्पना आलेल्या सरकारने मोर्चा मुंबईत येऊ दिला नाही. गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे सरकारने आश्वासन या शेतकऱ्यांना दिले होते. पण ते पूर्ण न झाल्याने पुन्हा शेतकरी मुंबईवर धडकणार होते.निरूपम यांनी सरकारवर निशाणा साधताना सरकारने आताही खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप अप्रत्यक्षरित्या केला आहे.यंदाच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न हा मुख्य मुद्दा राहील,असे संकेत निरूपम यांच्या टीकेवरून मिळाले आहेत.