राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली
मुंबई नगरी टीम
जालना : राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे.युती झाली तरीही आपण जालन्यातून निवडणूक लढवणार असल्याचे खोतकर यांनी म्हटले होते.गेल्या दोन दिवसांपासून खोतकर मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुक्काम ठोकून आहेत. पण ठाकरे यांनी त्यांना भेट नाकारली आहे.
उद्धव ठाकरे यांनी खोतकर यांना भेट नाकारली असली तरीही युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे खोतकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने खोतकर यांना ऑफर दिली आहे.आगामी लोकसभा निवडणूक आमच्याकडून लढावी,असे काँग्रेसने खोतकर यांना कळवले आहे.जालन्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे खोतकर यांच्यात राजकीय वैर कमालीचे आहे. दानवे जालन्यात भाजपचे उमेदवार असतील आणि खोतकरांना त्यांच्यासाठी काम करणे अशक्य आहे. खोतकर यांनी दानवे यांना आपण हरवूच,असा इशारा दिला होता. मात्र तेव्हा भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये युती झाली नव्हती.
दानवे आणि खोतकर यांच्यात हाडवैर असून तरीही युतीमुळे दोघांना निवडणूक एकत्र लढवावी लागते. पण मध्यंतरी दोन्ही पक्षांतील संबंध विकोपाला गेले होते. मात्र आता युती झाल्यावर सारी समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आता खोतकरांचे बंड शमविण्यात सेना यशस्वी होते की खोतकर काँग्रेसकडून निवडणूक लढवतात,हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.