देशाच्या संरक्षणापेक्षा भाजपाला निवडणुका महत्वाच्या वाटतात : धनंजय मुंडे
मुंबई नगरी टीम
मुंबई : देशाचे हित व राज्यातील जनतेची सुरक्षा विचारात घेऊन विधीमंडळ अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यास आम्ही सहमती दिली. परंतु सरकार आणि भाजप देशहिताला तिलांजली देत आहेत. पाकिस्तानविरुद्ध लढण्यासाठी लष्कराची आणि राज्यांतर्गत सुरक्षेसाठी पोलीसांची तयारी सुरु असताना, देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे मंत्री मात्र “मेरा बुथ, सबसे मजबूत”चे कार्यक्रम घेत निवडणुकीच्या तयारीत गुंग आहेत. देशाच्या संरक्षणापेक्षा, युद्धातल्या विजयापेक्षा भाजपला निवडणुकीतला पराभव वाचवणे महत्वाचे वाटत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप सरकारच्या खोटारडेपणावर कडाडून हल्ला चढवला.
राज्याच्या अर्थथसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक, वंचित, उपेक्षित, दुर्बल, महिला, विद्यार्थी, युवक, व्यापारी, उद्योजक अशा कुठल्याही घटकाला न्याय मिळालेला नाही. हा अर्थसंकल्प वस्तुस्थितीशी विसंगत आहे. शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी काय केले पाहिजे यासंदर्भातील आमच्या मागण्या, सूचना, शिफारशी आम्ही सभागृहाच्या पटलावर ठेवल्या आहेत. सरकारने त्यावर विचार करुन अंमलबजावणी करावी व त्यासंदर्भात आम्हाला कळवावे, असे आपण सभागृहात मांडल्याचे मुंडे यांनी सांगितले.
या अधिवेशनात दुष्काळावर चर्चा होणे अपेक्षित होते. दुष्काळी उपाययोजना, शेतकरी कर्जमाफी, पिकविम्याचे अनुदान, केंद्राची मदत, जलयुक्त शिवार, टँकरने पाणीपुरवठा असे अनेक मुद्दे चर्चेला घ्यायचे होते, परंतु ते येऊ शकले नाहीत. त्यासंदर्भात आपण स्वतंत्रपणे सरकारशी लढणार आहोत, असे मुंडे म्हणाले.
धनगर बांधवांना आरक्षण मिळण्याबाबतचा अशासकीय ठराव आपण सभागृहात मांडला. अधिवेशन चालू राहिले असते तर हा ठराव चर्चेला येऊन धनगर बांधवांना न्याय मिळण्यास मदत झाली असती. परंतु सरकार या मुद्यावर चालढकल का करते आहे ? ‘टीस’चा अहवाल का दाबून ठेवण्यात आला ? धनगर आरक्षणावर सरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे, असे सांगण्यात आले. परंतु यासंदर्भात कुठल्याच न्यायालयात प्रकरण नसताना, सरकार प्रतिज्ञापत्र कुठल्या न्यायालयात देणार आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणीही मुंडे यांनी केली.देशाचा सैनिक आज सीमेवर लढत आहे, त्याच सैनिकांबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्ल अभद्र वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय शासनाकडून आज सभागृहात होतो, हे दुर्दैवी आहे. कामकाजाच्या शेवटच्या क्षणी आमदार परिचारक निलंबन रद्द करण्याच्या कृतीला विरोधी पक्ष म्हणून आम्ही कडाडून विरोध केला. परिचारकांचे निलंबन रद्द होणे हा सैनिकांचा अपमान असल्यानं आम्ही अखेरपर्यंत या निर्णयाला विरोध करु, असा निर्धार मुंडे यांनी बोलून दाखवला.
मुंडे पुढे म्हणाले की, भारतीय हवाई दलान पाकिस्तान सीमा आणि पाकिस्तानमधल्या दहशतावादी तळांवर हल्ला करुन पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. त्याबद्दल सर्व विरोधी पक्षानी भारतीय सैनिकांचे अभिनंदन केले.पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईत संपूर्ण देश भारतीय सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, याची ग्वाही आम्ही दिली. या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा होत्या. परंतु त्या पूर्ण करण्यात अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे. याचा पुनरुच्चारही मुंडे यांनी केला.