आमदार बाळू धानोरकर करणार शिवसेनेला जय महाराष्ट्र
मुंबई नगरी टीम
चंद्रपूर : भाजप आणि शिवसेना यांच्यात मध्यंतरी जो तीव्र संघर्ष झाला,त्यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षातील नेत्यांची मने प्रचंड दुखावली आहेत.आता अचानक स्थानिकांना जुळवून घेता येणे शक्य नाही. युती करण्याचा पहिला फटका चंद्रपूरमध्ये बसला असून शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचे ठरवले असल्याचे समजते.वरोरा येथील आमदार धानोरकर यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले असल्याचे कळते. गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याशी ते लढत देतील.
यासंदर्भात त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेटही घेतली.भाजप आणि शिवसेना यांच्यात जेव्हा संघर्ष शिगेला पोहचला होता त्याच्या कितीतरी आधी अहिर आणि धानोरकर यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य टोकाला गेले होते. युती असूनही अहिर यांनी आपल्याला निवडणुकीत कोणतीही मदत केली नाही,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे बाळू धानोरकर यांनी आता अहिर याना टक्कर देण्याची तयारी केली आहे.युती झाल्याने नाराज झालेल्या धानोरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपण निवडणूक लढवण्यास तयार नसल्याचे सांगितले आहे.
शिवसेनेत नाराजांची संख्या वाढत आहे.डॉ. अमोल कोल्हे यांनी तर राष्ट्रवादमध्ये प्रवेश केला. जालन्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर नाराज आहेत. त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. त्यांची समजूत काढण्यात शिवसेनेला यश आले आहे. मात्र स्थानिक पातळीवर युती कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाले नाही,हे स्पष्ट होत आहे.