दानवे खोतकर वादात सुभाष देशमुख यांची मध्यस्थी
मुंबई नगरी टीम
जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे वैर विकोपाला गेले असून दानवे यांना लोकसभेला पराभूत करण्यासाठी खोतकर यांनी चंग बांधला आहे. मात्र आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी दानवे खोतकर वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आज त्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना मध्यस्थी करण्यासाठी पाठवले.देशमुख यांनी दोघांशी बंद दाराआड चर्चा केली.
या चर्चेनंतर देशमुख यांनी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याची ग्वाही दिली. चर्चा सकारात्मक झाली असून भाजप आणि शिवसेना युतीसाठी दोघे नेते काम करतील,असे देशमुख म्हणाले. दानवे यांनी चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून आमच्या चेहऱ्यांवरून तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल,असे म्हटले.खोतकर यांनी मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर निर्णय घेण्यात येईल,असे स्पष्ट केले. यामुळे आता दानवे आणि खोतकर यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता आहे.बैठक खोतकर यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी देशमुख यांनी पक्ष वाढवताना दोघांमध्ये मतभेद झाले. आता दोघांनी युतीसाठी काम करावे,असा सल्ला दिला.
खोतकर म्हणाले की,मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ही बैठक झाली आहे.मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील. उद्धव ठाकरे यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम राहील.गेल्या काही दिवसांपासून दानवे आणि खोतकर यांच्यातील वादाने गंभीर वळण घेतले आहे. युती झाली तरीही आपण दानवे यांच्याविरोधात लोकसभेला उभे राहू,असे खोतकर यांनी जाहीर केले होते.