आजी-माजी सैनिकांच्या शिक्षक पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळा

आजी-माजी सैनिकांच्या शिक्षक पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळा

मुंबई नगरी टीम

 मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढणा-या कुटूंबियांची काळजी घेत आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला. जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या आजी-माजी सैनिकांच्या शिक्षक पत्नींना आता या निर्णयामुळे  आंतरजिल्हा बदलीने त्यांच्या मुळ जिल्हयात जाता येणार आहे. बदलीचा हा  मार्ग सहज सोपा करून त्यांनी जवानांच्या कुटूंबियांना मोठा दिलासा दिला आहे.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या सध्या संगणकीय प्रणालीद्वारे केल्या जातात. बदल्यांची ही प्रक्रिया चार टप्प्यात केली जात असली तरी दुस-या टप्प्यात विशेष संवर्ग भाग १ मध्ये गंभीर आजाराने त्रस्त असलेले कर्मचारी, अपंग कर्मचारी, आजी-माजी सैनिक व अर्ध सैनिक जवानांच्या पत्नी, विधवा यांचा समावेश आहे. आपले सैनिक देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढत प्रतिकुल परिस्थितीत देशाचे संरक्षण करत असतात, मात्र त्यांचे कुटूंब त्यांच्या मुळ गांवी असतेच असे नाही, ब-याच वेळा अशा सैनिकांच्या पत्नी जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून कार्यरत असतात. मुळ गावांपासून त्या दूर ठिकाणी कार्यरत असल्यास अशा वेळी त्यांना अनेक कौटूंबिक अडचणींना सामोरे जावे लागते.

आजी-माजी सैनिकांच्या शिक्षक असलेल्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदली  पंकजा मुंडे यांनी  जागतिक महिला दिनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाने सोपी झाली आहे. जवानांच्या शिक्षक पत्नींना त्यांच्या मुळ जिल्हया ऐवजी अन्य जिल्हयात कार्यरत असल्यास आणि त्यांना आंतरजिल्हा बदलीने मुळ जिल्हा परिषदेत जायचे असल्यास त्यांची त्या ठिकाणी तात्काळ बदली करण्याचे आदेश  पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. संबंधित जिल्हा परिषदेने त्यांना हजर करून घेताना प्रवर्ग बिंदूनुसार त्यांचे समायोजन करावे, तथापि  संबंधित शिक्षकाच्या निवडीच्या प्रवर्गाचा बिंदू नसल्यास त्याला रिक्त पदांवर रूजू करावे आणि त्याच्या प्रवर्गाचा बिंदू ज्यावेळी रिक्त होईल त्यावेळी त्या बिंदुवर त्याचे समायोजन करावे असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Previous articleसाता-यातुन उदयनराजे भोसलेंनाच उमेदवारी
Next article९२ वर्षाचा असलो तरीही  रावसाहेब दानवेंविरोधात लढेन