सुजय विखे यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभेतील विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.काल सुजय आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची बैठक झाली. त्यात सुजय विखे यांची नगरमधील उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची,असा निर्धार सुजय विखे यांनी केला होता.राष्ट्रवादीने विखे यांना नुसतेच झुलवत ठेवले आणि नगरची जागा सोडण्यास नकार दिला. यामुळे कोणत्याही पक्षात जायची तयारी असलेल्या सुजय विखे भाजपकडे गेले आहेत. महाजन यांच्या भेटीत सुजय यांना भाजपची उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
काही दिवसांपासून शरद पवार आणि राधाकृष्ण विखे यांच्यात अनेक गुप्त बैठका झाल्या. सुजय यांना राष्ट्रवादीतर्फे उभे करण्यासाठी ही सारी कसरत होती. पण पवारांनी मी विखे यांना भेटलोच नाही असे म्हटले तेव्हा विखे काय ते समजले आणि त्यांनी भाजपची वाट धरली. विखे यांनी भाजपमध्ये यावे म्हणून मुख्यमंत्री प्रयत्नशील होते. मात्र स्वतः राधाकृष्ण विखे पक्षांतर करणार का,याबाबत स्पष्ट समजले नाही.सुजय विखे यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी धक्का असेल. कारण विखे यांची नगर परिसरात मोठी ताकद आहे. अनेक संस्था ताब्यात आहेत. त्यामुळे भाजपच्या हाती मोठा मोहरा लागला आहे. याचा फटका काँग्रेसला बसणार आहे.