आता सुप्रीम कोर्टाला ही गलथान निर्णय म्हणणार का ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : मी भ्रष्ट्राचार उघड केल्यावर गलथान आरोप म्हणणा-या महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे आता पोषण आहाराचे कंत्राट
घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालालाही गलथान निर्णय म्हणणार का ? असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी महिला बालविकास विभागातील १२० कोटी रुपयांचा मोबाइल घोटाळा उघडकीस आणल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मी असल्या गलथान आरोपांना उत्तर देत नसते अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर काल सुप्रीम कोर्टाने पोषण आहार कंत्राट संदर्भात दिलेल्या मोठया निर्णयानंतर आता ताई सुप्रीम कोर्टालाही गलथान निर्णय म्हणणार का ? असा सवाल धनंजय मुंडे यांनी एका ट्विट द्वारे विचारला आहे.
पोषण आहाराच्या संदर्भात आपण तीन वर्षांपूर्वी या विषयात जे जे मुद्दे मांडले ते सर्व कोर्टाने ग्राह्य धरले व हे कंत्राटदार धार्जिणे कंत्राट रद्द केले. याबाबत मी जे जे मुद्दे मांडले ते सरकारने नेहमीप्रमाणे त्यावेळी साफ फेटाळून लावले होते. त्याचवेळी जर दखल घेऊन कारवाई केली असती तर आज अशी सुप्रीम कोर्टाची चपराक खाण्याची वेळ आली नसती असा टोला ही त्यांनी दुसऱ्या ट्विट मध्ये लगावला आहे.