राजीव सातव यांची निवडणूक रिंगणातून माघार?

राजीव सातव यांची निवडणूक रिंगणातून माघार?

मुंबई नगरी टीम

मुंबई : मोदी लाटेतही निवडून आलेले हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचे ठरवले असल्याची चर्चा आहे.  गुजरातमधील जबाबदारीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

राजीव सातव सध्या गुजरातचे प्रभारी आहेत.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जात असल्याने काँग्रेस हादरली आहे. अशा वेळी काँग्रेसची जबाबदारी जास्त महत्वाची आहे, यासाठी त्यांनी माघार घेण्याचे ठरवले आहे, असे अधिकृतपणे सांगण्यात येत आहे.मात्र त्यांनी निर्णय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सोपवला आहे.सातव यांनी गुजरातमधील जबाबदारीचे कारण दिले असले प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी त्यांचे पटत नसल्याचे सर्वश्रुत आहे. दोन वर्षांपूर्वी सातव यांना चव्हाण यांच्या जागी आणले जाईल, अशी बातमी होती.मात्र सातव सध्या गुजरात निवडणुकीत कमालीचे व्यस्त आहेत. उमेदवार निवड करण्याच्या कामात ते गुंतलेले असल्याने खरोखरच ते गुजरात जबाबदारीमुळे हिंगोलीत निवडणूक लढवण्यास इच्छुक नसावे,असेही बोलले जाते.२०१४मध्ये राजीव सातव आणि अशोक चव्हाण या दोघांनी विजय मिळवला.चुरशीच्या लढतीत सातव यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे आणि बसपचे उमेदवार चुन्ननीलाल जाधव यांचा पराभव केला.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात १९९१पासून जोरदार सामना काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच पहायला मिळतो. शिवसेना उमेदवार वानखेडे हेच आता भाजपमध्ये गेले असल्याने शिवसेनेपुढे उमेदवार शोधण्याचे आव्हान आहे. शिवसेनेकडून हिंगोलीचे तिकीट कोणाला देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी उमेदवारीसाठी हेमंत पाटील आणि जयप्रकाश मुंदडा यांच्यात चुरस असल्याचे म्हटले जात आहे.राजीव सातव यांच्याबाबतीत मात्र निर्णय राहुल गांधी हेच घेतील.

 

 

Previous articleनिवडणुकीत जिंकू असा विश्वास शरद पवारांना नसेल
Next articleपवारांना तेवढे भाजपमध्ये घेऊ नका