दररोज एक मोठे घराणे भाजपमध्ये येईल
मुंबई नगरी टीम
कोल्हापूर : इतर पक्षातील मातब्बर राजकीय घराण्यातील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याबद्दल भाजपवर टीका होत आहे. मात्र महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले की, एक मोठे घराणे भाजपसोबत येणार आहे. आता उत्तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असून तेथील एक घराणे भाजपमध्ये येणार आहे.
परवा सोलापुरातील एक घराणे भाजपमध्ये येणार आहे, असे दावे त्यांनी केले.पाटील म्हणाले की,पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील मोठी घराणी भाजपमध्ये दाखल होणार आहेत. पक्षाची ताकद वाढणार आहे.उत्तर महाराष्ट्रातील एक घराणे पक्षात आलेले तुम्हाला लवकरच पहायला मिळेल. सोलापुरातील एक घराणेही दाखल होईल.महाभारतामध्ये स्वकीयांशी युध्द करताना अर्जुनाची जी अवस्था झाली, तीच अवस्था माझी, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची झाली आहे.आम्हा तिघांनाही आता ही व्दिधास्थिती सोडून तेच करावे लागणार आहे. समोर खासदार धनंजय महाडिक हा परममित्र लढत असताना आम्हालाही युतीधर्मच पाळत संजय मंडलिक यांना ताकदीने निवडून आणण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांना पंतपधान करण्यासाठी लढावे लागणार आहे. धनंजय महाडिक हे माझे परममित्र आहेत. अमल महाडिक यांचे ते भाऊ आहेत. तर अध्यक्षा शौमिका महाडिक यांचे ते दीर आहेत. महाडिक हे राष्ट्रवादीतून लढत आहेत. आम्ही मात्र भाजपचे खंदे कार्यकर्ते आहोत, पक्षाला दिशा देणारे आहोत. पण युतीधर्म महत्वाचा आहे. धनंजय महाडिकच शिवसेनेचे उमेदवार असावेत, यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.
पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून उत्तर महाराष्ट्र आणि सोलापुरातील कोणत्या घराण्याबाबत पाटील यांनी हे वक्तव्य केले,यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.