अशोक चव्हाण यांच्याविरोधात भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर ?

अशोक चव्हाण यांच्याविरोधात भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर ?

मुंबई नगरी टीम

नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात भाजपकडून शिवसेनेचा मोहरा आणि आता भाजपकडे असलेल्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उतरवण्याचे ठरवले आहे,असे समजते.नांदेड हा चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. नांदेडमध्ये भाजपतर्फे प्रताप पाटील चिखलीकर मैदानात असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि प्रताप पाटील यांच्या भेटीत ही उमेदवारी अंतिम झाल्याचे सांगण्यात येते. प्रताप पाटील यांच्या उमेदवारीमुळे त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले असून काँग्रेसची स्थिती बिकट होऊ शकते.

आमदार  प्रताप पाटील चिखलीकर हे लोहा कंधार विधानसभेचे शिवसेनेचे आमदार आहेत. शिवसेनेकडून निवडून आल्यानंतर ते फडवणीस यांचे समर्थक बनले आणि आजतागायत कायम आहेत. यापूर्वीही एकदा अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले होते.राज्यातील मान्यवर नेते विलासराव देशमुख, शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी त्यांची सलगी प्रसिद्ध आहे.

मूळचे काँग्रेसी असलेल्या प्रताप पाटील यांचे  अशोक चव्हाण यांच्याशी तीव्र वैमनस्य आहे.म्हणून भाजपने प्रताप पाटील यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांचा लोहा हा विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या लातूर मतदारसंघात येतो.काँग्रेसला टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रताप पाटील यांची उमेदवारी निश्चित केली आहे. मोदी लाटेतही निवडून आलेल्या चव्हाण यांच्यासाठी

प्रताप पाटील यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक एकतर्फी होणार नाही. हे उघड आहे.चव्हाण यांची बलस्थाने आणि कमजोरी चिखलीकर ओळखतात. म्हणून चव्हाण यांना ही निवडणूक जड जाणार आहे.अर्थात,काँग्रेसच्या उमेदवार यादीत अद्याप चव्हाण यांचे नाव जाहीर झालेले नाही. अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस स्थानिक काँग्रेस समितीने केंद्रीय समितीकडे पाठवली आहे. पण काँग्रेसचा उमेदवार कुणीही असला तरीही चिखलीकर हेच युतीचे उमेदवार असतील. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

 

Previous articleबीडमध्ये राष्ट्रवादीला नाराजीचे ग्रहण
Next articleराज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार ?