पुण्यातून आयारामांना उमेदवारी देण्यास विरोध

पुण्यातून आयारामांना उमेदवारी देण्यास विरोध
मुंबई ‌नगरी टीम
पुणेः पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस कुणाला उमेदवारी द्यायची याचा अजूनही निर्णय करू शकलेली नाही. प्रवीण गायकवाड आणि काँग्रेसच्या वाटेवर असलेले भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे उमेदवारीच्या आशेवर आहेत. पण पुण्यात आयारामांना उमेदवारी नको, असे पत्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राहुल गांधी यांना लिहिले आहे.गेल्या आठवड्यापासून आयारामाला काँग्रेसची उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील निष्ठावंत अस्वस्थ झाले असून आयारामांना उमेदवारीच नको, असे साकडेच निष्ठावंतांनी राहुल गांधींना घातले आहे.

काँग्रेसच्या पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अनेक नावे समोर आली.संजय काकडे आणि प्रवीण गायकवाड यांच्याभोवती काँग्रेस उमेदवारीची चर्चा केंद्रीत झाली आहे.पण काँग्रेसमधील निष्ठावंतांचा या दोन्ही उमेदवारांना विरोध आहे. निष्ठावंतांपैकी कुणालाही उमेदवारी द्या, पण आयारामांना उमेदवारी नको,असे साकडेच त्यांनी राहुल गांधींना घातले आहे.

पुण्यात निष्ठावंतांमध्येही अनेक दावेदार आहेत. निष्ठावंतांमधील कोणत्याही एका नावावर पक्षात एकमत नाही. त्यामुळं आयाराम नको,पण पर्याय कोण? हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. या स्थितीत काकडे किंवा गायकवाड याना उमेदवारी मिळाली तरीही विरोधात अनेक जण असल्याने त्यांची बिकट वाट झाली आहे.

Previous articleराज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार ?
Next articleमोहिते पितापुत्र भाजपच्या वाटेवर?