विखे पाटील यांच्या राजीनाम्याच्या अफवेने खळबळ !

विखे पाटील यांच्या राजीनाम्याच्या अफवेने खळबळ !

मुंबई ‌नगरी टीम

मुंबईःमहाराष्ट्रात आज दिवसभर विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील. यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले होते. पण ती अफवा असल्याचे नंतर स्पष्ट झाले. विखे यांचे विरोधीनेतेपद कधीही जाऊ शकते,असे वृत्त देण्यात आले होते. पण विखे यांच्या निकटवर्तीयांनी त्यांनी राजीनामा दिलेला नाही,असे स्पष्ट केले.

नियमाप्रमाणे विरोधी पक्षनेत्याला विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्यावा लागतो. तो अद्याप दिलेला नाही. पक्षश्रेष्ठींना भेटायला विखे पाटील दिल्लीला गेले नाहीत. ते मागील तीन दिवसांपासून प्रवरा लोणी मतदारसंघातच आहेत,असे सांगण्यात आले. राजीनाम्याची बातमी म्हणजे खोडसाळपणा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. नगरमध्ये सुजय विखे पाटील यांनी केलेले बंड राष्ट्रवादी कॉंग्रेसने उभ्या केलेल्या अगतिकतेमुळे असल्याचा विखे पाटील यांचा दावा खोटा असल्याची भूमिका दिल्लीपर्यंत पोचली असली तरी, त्यांच्यावर निवडणूक होईपर्यंत कोणतीही कारवाई करणे शक्‍य नसल्याचे कळवण्यात आले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक तंत्राने कॉंग्रेसला दुय्यम स्थान दिले असल्याची भावना राज्यात आहे. प्रत्यक्ष विरोधी पक्षनेत्याला तीनदा हरलेली जागा जिंकण्याची शक्‍यता असताना पोटच्या मुलासाठी सहकारी पक्षाकडून मिळवता आली नाही. कॉंग्रेस पक्षाची अवस्था एवढी दयनीय का झाली याचा विचार करावा, असे काही ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना पदावरून हटवले तर कॉंग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पद गमवावे लागेल. या पदावर अर्थातच राष्ट्रवादीचा कब्जा होईल आणि ते काँग्रेसला परवडणारे नाही. बाळासाहेब थोरात यांना विखे यांच्याविरोधात मोहीम तूर्तास थांबवण्यास सांगितले आहे.

Previous articleदाऊदला आणण्याची संधी पवारांमुळे हुकली :प्रकाश आंबेडकर
Next articleकाटोल पोटनिवडणुकीला अंतरीम स्थगिती