काटोल पोटनिवडणुकीला अंतरीम स्थगिती
मुंबई नगरी टीम
नागपूरः आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या काटोल विधानसभा मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. काटोल विधानसभेची पोटनिवडणूक ११ एप्रिलला घेण्यात येणार होती.
आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभेबरोबरच काटोल विधानसभा मतदारंसघातील पोटनिवडणूक होणार होती. हा मतदारसंघ कायम राखण्याकरिता भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, सहा महिन्यांसाठीच आमदारकी मिळणार असल्याने राजकीय नेत्यांमध्ये या पोटनिवडणुकीबाबत फारशी उत्सुकता दिसत नव्हती.अॉक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अटीतटीच्या लढतीत विजयी झालेल्या उमेदवाराला फक्त सहा महिने मिळणार असून पुन्हा त्याला लगेच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. सहा महिन्यासाठी आयोगाने खर्च करू नये, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यावर न्यायालयाने आज अंतरीम स्थगिती देऊन पुढील सुनावणी २एप्रिलला ठेवली आहे.
काटोल हा राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांचा पारंपरिक मतदारसंघ असून गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष देशमुख यांनी काका अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. भाजपमध्ये न रमल्याने आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता पोटनिवडणूक होत असली तरी ते लढणार नव्हते.
काटोल पोटनिवडणुकीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. भाजपा आणि राष्ट्रवादीतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली होती. ही निवडणूक घेऊ नये, यासंदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली होती.