रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये

रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये

मुंबई नगरी टीम

मुंबई : काँग्रेसचे सुजय विखे पाटील यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे सोलापुरातील खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.राष्ट्रवादीला यामुळे जबरदस्त धक्का बसला आहे. त्यामुळे माढा येथील निवडणूक राष्ट्रवादीला  जड जाणार आहे.

गरवारे क्लबमध्ये रणजीतसिंह मोहिते-पाटलांचा भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी रणजीतसिंह मोहिते पाटलांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.राज्यातील मोठी घराणी आता भाजपवर विश्वास दाखवत आहे.तसेच येत्या आठवडाभरात भाजपमध्ये आणखी लोक येतील, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.काल (मंगळवारी) अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रणजीतसिंह मोहिते पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली. कृष्णाभीमा स्थिरीकरण हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे, असं रणजीतसिंह म्हणाले होते.

विजयसिंह मोहिते पाटील यांना यंदा उमेदवारी नाकारण्यात येणार, हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला. शरद पवारांनी उमेदवारी जाहीर करून ती मागे घेतल्यापासून माढा मतदारसंघ राज्यात गाजत आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत अनेक समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे सोलापूर आणि माढ्यात भाजपची ताकद वाढली आहे.विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर राष्ट्रवादी कारवाई करतो का,याची आता उत्सुकता आहे.

 

 

Previous articleराज ठाकरे आणि शरद पवार भेटीने तर्कवितर्कांना उधाण
Next articleनगरमध्ये सुजय विखे विरूद्ध संग्राम जगताप सामना रंगणार