राष्ट्रवादीच्या “त्या” नगरसेवकांचे निलंबन अखेर मागे
मुंबई नगरी टीम
अहमदनगरःमहापालिका निवडणुकीत ऐन वेळी भाजपला साथ देऊन भाजपचा महापौर आणि उपमहापौर बसवण्यास मदत करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांचे निलंबन आज मागे घेण्यात आले आहे. राष्ट्रवादीसाठी नगर लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने नगरसेवकांची नाराजीचा फटका बसू नये,म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
भाजपचे १४नगरसेवक निवडून आले असतानाही राष्ट्रवादीच्या १८नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला.त्या बदल्यात त्यांनी कोणतीही पदे घेतली नाहीत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर जायचे नाही,असा आदेश दिला होता,असे नंतर सांगितले. मात्र पवारांना न जुमानता हे नगरसेवक भाजपबरोबर गेले. भाजप राष्ट्रवादी छुप्या युतीचा संदेश राज्यभर जाईल,या भीतीने नगरसेवकांना ब-याच काळानंतर निलंबित करण्यात आले.पण आता नगरची जागा राष्ट्रवादीसाठी खूप प्रतिष्ठेची बनली आहे. ही जागा काँग्रेसला न सोडल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी भाजप प्रवेश केला. त्यामुळे नगरची जागा सर्वांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.१८नगरसेवक जर निलंबित राहिले असते तर पक्षाला फटका बसला असता.म्हणून त्यांचे निलंबन अखेर मागे घ्यावे लागले आहे.