मला कुठलीच निवडणूक अवघड वाटली नाही
मुंबई नगरी टीम
पुणे : मी जितक्या निवडणुका लढल्या त्यातील कुठलीच निवडणूक मला अवघड वाटली नाही. मी जितक्या दृढ निश्चयाने महानगरपालिकेत प्रवेश केला, तितक्याच आत्मविश्वासाने आमदार आणि मंत्री म्हणून मी विधानसभेत प्रवेश केला. आणि आता त्याच दृढनिश्चयाने मी लोकसभेत जाणार आहे असा आत्मविश्वास पुण्याचे भाजपाचे लोकसभा उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार गिरिश बापट यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, शिवसेना उपनेत्या निलमताई गोऱ्हे, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे, भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे,आरपीआय शहर अध्यक्ष अशोक कांबळे हे उपस्थित होते.
मी गेली ४५ वर्ष शहराचे नेतृत्व करत आहे. या काळात मी जितक्या निवडणुका लढल्या त्यातील कुठलीच निवडणूक मला अवघड वाटली नाही. मी जितक्या दृढ निश्चयाने महानगरपालिकेत प्रवेश केला, तितक्याच आत्मविश्वासाने आमदार आणि मंत्री म्हणून मी विधानसभेत प्रवेश केला. आणि आता त्याच दृढनिश्चयाने मी लोकसभेत जाणार आहे. कार्यकर्ता ही माझी ताकद आहे. या कार्यकर्त्यांच्या जीवावर मी एवढे यश प्राप्त केले आहे. राजकीय जीवनात मी आजवर कोणाला शत्रू मानले नाही. सर्व पक्षातील नेत्यांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे ही लढाई मैत्रीपूर्ण होईल असा मला विश्वास आहे. या निवडणुकीच्या प्रचारात मी कोणावरही वैयक्तिक टिका – टिप्पणी करून प्रचाराची पातळी घसरू देणार नाही. मी आजवर केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुकीत मतं मागणार आहे असे बापट यांनी सांगितले.