नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करू नये

नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करू नये

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वर्धा येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी आणि पवार घराण्यावर टीका केली असता त्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदी यांनी राष्ट्रवादी आणि कुटुंबाची काळजी करू नये. पक्षाचे हित पाहण्यासाठी देशातील लक्षावधी कार्यकर्ते समर्थ आहेत, असा टोला त्यांनी  कोल्हापूर येथे झालेल्या  महाआघाडीच्या मेळाव्यात लगावला.

मोदी यांनी काल वर्धा येथील झालेल्या  सभेत पवार यांना लक्ष्य केले होते. त्या टीकेला पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा  कोणा एकट्या-दुकट्याची नाही तर राज्यातील आणि देशातील लक्षावधी कार्यकर्त्यांचा  आहे. ते  पक्षाची काळजी वाहण्यास तत्पर असल्याने पंतप्रधान मोदींनी काळजी करू नये. गांधी घराण्याने देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले आहे. त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या मोदी यांच्याकडून फारशा अपेक्षा करू नयेत, असा सल्ला पवार यांनी यावेळी दिला. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता पक्षाचे १६ खासदार निवडून येतील असा आशावाद व्यक्त करीत मोदींना सत्तेवरून खेचण्याची ताकद पवार यांची असल्याने त्यांना भाजपा बदनाम करत आहे. त्यामुळे  पाटलांनी  पवारांच्या घराची चिंता करण्यापेक्षा आपले घर सांभाळले तरी पुरे झाले, असा टोला त्यांनी लगावला.

Previous articleपृथ्वीराज चव्हाणांनी पुढील पंतप्रधान कोण होणार हे घोषित करावे
Next article… तर जागा दाखवल्याशिवाय राहत नाही : शरद पवार