… तर जागा दाखवल्याशिवाय राहत नाही : शरद पवार
मुंबई नगरी टीम
उस्मानाबाद : आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतून आलो आहोत. कुणाची कळ काढत नाही परंतु कुणी कळ काढली तर जागा दाखवल्याशिवाय राहत नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना दिला.उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शरद पवार यांनी मोदींवर तोफ डागतानाच त्यांनी केलेल्या टिकेलाही चोख प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान मोदी मला विचारतात की, संरक्षण खाते तुमच्याकडे असताना तुम्ही काय केले. तुमच्या कार्यकाळात देशावर जेवढे हल्ले झाले तेवढे हल्ले आम्ही होवू दिले नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.गेली अनेक वर्षे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात काम केले आहे. हा भाग नेहमीच पाण्यापासून वंचित होता. अशा डॉक्टरसाहेबांकडे पाटबंधारे विभागाची जबाबदारी आली आणि आपल्या अधिकाराच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांनी इथल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राणा जगजितसिंह यांनी ती जबाबदारी घेतली. लोकांनी आमदारकीच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात राणा जगजितसिंह यांना सत्ता दिली आणि या सत्तेचा उपयोग राणा यांनी जिल्ह्याचा विकास गतिमान करण्यासाठी केला असे उदगारही शरद पवार यांनी काढले.
मी असेन किंवा शिवराज पाटील चाकुरकर असतील आम्ही देशासाठी अतोनात काम केले. आता वेळ आली आहे तरुणांनी पुढे येण्याची. त्यामुळेच आम्ही राणा जगजितसिंह यांचे नाव निवडले. मला खात्री आहे राणा जगजितसिंह योग्यप्रकारे उस्मानाबादचे प्रतिनिधित्व लोकसभेत करतील त्यामुळे तुम्ही त्यांच्या पाठिशी खंबीर उभे रहा असे आवाहन शरद पवार यांनी केले.लातूरमध्ये भूकंप झाला त्यावेळी परिस्थिती बिकट होती मात्र केंद्रसरकार आमच्या पाठिशी उभे होते म्हणून आम्हाला संकटावर मात करता आली. या सगळ्यात शिवराज पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. लातूरकडून विलासराव मदतीला धावून आले होते. त्यामुळे या भागाला पुन्हा कणखर नेतृत्वाची गरज आहे असेही शरद पवार म्हणाले.महाआघाडीने यावेळी सर्वच मतदारसंघात तरुण उमेदवार दिले आहेत. आम्ही जाणीवपूर्वक तरुणांची निवड केली आहे अशी पक्षाची स्पष्ट भूमिकाही शरद पवार यांनी मांडली.
गेली पाच वर्षे भाजपचे राज्य आहे. दिलेले राज्य लोकांसाठी वापरायचे असते पण ते गेल्या पाच वर्षात झाले नाही. ७० वर्षात देशात काहीच विकास झाला नाही असे मोदी बोलत आहेत. ७० वर्षात अटलबिहारी वाजपेयी ही पंतप्रधान होते मग अटलबिहारी वाजपेयी यांनीही काम केले नाही असे मोदींना म्हणायचे आहे का ? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त नेहरू आणि गांधी घराण्यावर टीका करायला जमतं. खरंतर मोदींना इतिहासच माहिती नाही. स्वातंत्र्य चळवळीत नेहरूंनी ९ वर्षे तुरुंगात घालवली, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जग पातळीवर पाठिंबा मिळवला आणि भारताला महाशक्ती बनवण्यास सक्षम असे काम केले.लालबहादूर शास्त्री यांच्या कणखर नेतृत्वाने पाकिस्तानला धडा शिकवला, इंदिरा गांधी यांनी अनेक ठोस निर्णय घेतले. त्यांनी इतिहास घडवला नाही तर भूगोल बदलून टाकला, राजीव गांधी यांनी भारतात तंत्रज्ञान आणले, फोन, इंटरनेट आणले हे काँग्रेसचे कर्तृत्व आहे असेही शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले. आताचे पंतप्रधान लष्कराच्या कामगिरीवर स्वतःचा प्रचार करत आहेत. या सरकारला कुलभूषण जाधव यांना अजूनही सोडवता आले नाही. कुठे गेली ५६ इंचाची छाती ? असा संतप्त सवालही पवार यांनी केला.