लुंग्यासुंग्यांच्या टीकेवर मी लक्ष देत नाही : शरद पवार

लुंग्यासुंग्यांच्या टीकेवर मी लक्ष देत नाही : शरद पवार

मुंबई नगरी टीम
अहमदनगर : अगोदर गांधी परिवाराला शिव्या घातल्या आता माझा नंबर लागला आहे. बिनपैशाने माझी प्रसिध्दी होतेय. मग मी काय साधासुधा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतील आहे. त्यामुळे अशा लुंग्यासुंग्याने टिका केली तर मी लक्ष देत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या टिकेचा समाचार घेतला.

शरद पवार यांनी मोदी आणि त्यांचे पाच वर्षातील कारनामे याचा पाढाच वाचला शिवाय राष्ट्रवादीने तरुण पिढीला पुढे आणत देशात आणि राज्यात परिवर्तन घडवण्याचा संकल्प केल्याचे सांगताना या परिवर्तनाला साथ द्या असे आवाहनही त्यांनी शेवगांवच्या जाहीर सभेत केले.आपल्या देशात पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या पदव्या सरकारकडून दिल्या जातात परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला न मागता ‘थकबाकीदार’ ही पदवी मिळते. कर्जबाजारी, थकबाकीदार आणि निसर्गाची अवकृपा यामुळे बळीराजा आत्महत्या करतो आहे. मोठमोठ्या थकबाकीदारांची कर्जे माफ केली जातात परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आल्यावर त्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही अशी खंत व्यक्त करतानाच आम्ही देशातील शेतकऱ्यांची ७० हजार कोटीचे कर्ज माफ केले शिवाय व्याजदरही कमी केला होता याची आठवण पवार यांनी करुन दिली.

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याच्या जलपूजनाला मोदींनी १८ कोटी रुपये खर्च केले परंतु शिवाजींच्या नावाने राज्य करणार्‍या या सरकारने चार वर्षात एक वीटही रचली नाही. गुजरातमध्ये सरदार वल्लभ भाई पटेल यांचा सर्वाधिक उंचीचा पुतळा उभारला परंतु पुतळ्याला जेवढा खर्च आला नसेल तेवढा खर्च यांच्या जाहिरातीवर व कार्यक्रमावर झाला असा आरोपही शरद पवार यांनी केला. मोदी हे ५५ महिन्यात ९२ वेळा परदेशात गेले. त्यांच्या विमानावर जवळ जवळ २ हजार २१ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. परदेशात जमा झालेला काळापैसा आणणार सांगून गरीबांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार असे आश्वासन दिले. परंतु यामुळे काळा पैसा आला नाहीच शिवाय खात्यात १५ लाख रुपये येणार म्हणून कुटुंबात, भावाभावात भांडणे लागली मात्र पैशाचा अद्याप पर्यंत पत्ता नाही. या गोष्टीमुळे तोंड दाखवायला जागा नसल्याने म्हणून एक हजार आणि पाचशे रुपयांचा नोटा चलनातून बंद केल्या आणि या नोटा आता कागदाची रद्दी झाल्याचे सांगितले. नोटा बदलून घ्यायला रांगेत उभे केले यामध्ये ११० लोकांचा रांगेत नोटा बदलून घेण्यासाठी आपला जीव गमवावा लागला असेही  पवार यांनी सांगितले.

दुसर्‍या बाजूला दोन कोटी नोकर-या देणार असे सांगितले परंतु बेरोजगारांना नोकर्‍या मिळालेल्या नाहीत. चेकने व्यवहार करण्याचे फर्मान काढले. त्यावेळी आम्ही सरसकट चेकने व्यवहार नको असे सांगितले होते. कोथिंबीरची जुडी विकायला चेकने व्यवहार चालणार आहे का, चेकने केला नाही तर तो काळा पैसा. अहो ज्यांनी टॅक्समधुन पैसा दडवला तर तो काळा पैसा आहे परंतु जो शेतकरी घामाने पैसा कमवतो तो त्याच्या कष्टाचे पैसे असतात. मोदींनी अनेक स्वप्न दाखवली. परंतु ती पुर्ण केलीच नाहीत. बाजारात तुरी आणि कोण कोणाला मारी अशी म्हण आहे त्या जातीचे मी नाव घेणार नाही कारण त्यामुळे वाद वाढेल परंतु कशाचा पत्ता नाही मात्र भांडणे वाढली आहेत असेही शरद पवार म्हणाले.राज्यात ३४ हजार कोटीची कर्जमाफी करण्याचे फडणवीस यांनी जाहीर केले मात्र प्रत्यक्षात २५ टक्केही कर्जमाफी करण्यात आलेली नाही. सत्ता आली की भ्रष्टाचार संपवू सांगत होते परंतु सातबाराचा उतारासुध्दा सरळ मिळतो का, काहीतरी वजन टाकावे लागते की नाही असा थेट सवाल जनतेला केला.

कॉंग्रेसच्या सत्तेत ३५० कोटी रुपयांचे राफेल विमान खरेदी संदर्भात चर्चा झाली परंतु तत्पूर्वी कॉंग्रेसचे सरकार गेले. त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने दोन वर्ष यावर चर्चा केली. नंतर ही किंमत ७५० कोटीवर आली. मात्र पुन्हा एक वर्ष चर्चा केल्यावर ३५० कोटीचे राफेल विमान १६६० कोटी रुपये झाले. न खाऊंगा न खाने दूंगा असे सांगणार्‍या मोदींनी यामध्ये काय केले. दाल में कुछ काला है हे नक्की आहे असा आरोप करतानाच या खरेदीबाबतची माहिती मागवण्यात आली त्यावेळी गुप्त माहिती आहे सांगता येणार नाही असे सांगण्यात आले. या प्रकरणी काही लोक सुप्रीम कोर्टात गेल्यावर कोर्टाने कागदपत्रे मागविली त्यावेळी ती कागदपत्रे चोरीला गेली असे सांगण्यात आले. शेवटी मिडियामध्ये जोरदार टीका सुरु झाल्यावर ती कागदपत्रे काही लोकांनी बाहेर काढली व फोटोकॉपी करुन छापली असे उत्तर दिले. स्वर्गीय राजीव गांधी यांच्यावर याच भाजपाने बोफोर्समध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून चौकशी लावली होती परंतु आम्ही राफेलची चौकशी करा सांगत आहोत तर करत नाही. यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याचा अर्थ यांचा व्यवहार स्वच्छ नाही असा आरोपही  पवार यांनी केला.

देशावर प्रसंग येतो त्यावेळी मी राजकारण करत नाही. पुलवामामध्ये आपले ४० जवान शहीद झाले. त्यानंतर मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मलाही बोलावले होते. धडा शिकवला पाहिजे असे मोदी म्हणाले. त्यावेळी सैन्याला निर्णय घेण्याचा अधिकार द्या असे मी सांगितले. तो अधिकार दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. फार आनंद वाटला. त्यानंतर आपल्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांची घरे उध्वस्त केली. त्यांचा अभिमान आहे. त्यात काय झालं आपला एक जवान अभिनंदन हा पाकिस्तानमध्ये सापडला त्याला पाकिस्तानने अटक केली. जिनिव्हामध्ये सर्व देश एकत्र येवून जिनिव्हा हा करार झाला होता. की असा जवान सापडला तर त्याला सोडून दिले पाहिजे. त्याप्रमाणे अभिनंदनला सोडले. कायदयामुळे आणि त्यांच्या शौर्यामुळे तो सुटला. त्याचा अभिमान वाटला सैन्यदलाचा. मात्र ५६ इंचाची छाती आहे म्हणून सोडवून आणला असे राजकारण सुरु केले. ५६ इंचाची छाती आहे तर कुलभूषण जाधव अडीच वर्षे पाकच्या तुरुंगात का आहे. त्याला का सोडवले नाही. त्यावेळी ५६ इंचाची छाती कुठे गेली असा संतप्त सवाल करतानाच शौर्य कुणी दाखवायचे व श्रेय कुणी घ्यायचं असा टोलाही मोदींना लगावला. पाकिस्तानकडून २०१४ मध्ये २६७ हल्ले झाले तर २०१५ मध्ये २०८ आणि २०१६ मध्ये २१८ हल्ले झाले. त्यावेळी हमारा एक मारेंगे तो हम दस मारेंगे म्हणणार्‍या मोदींनी पुलवामा वगळता काय कारवाई केली असा सवालही मोदींना केला.

Previous articleदक्षिण मध्य मतदारसंघात हायटेक प्रचारासाठी काँग्रेस सज्ज
Next articleविरोधक सध्या सैरभर झालेत : विनोद तावडे