युनायटेड फॉस्फरस लि. आणि भाजपचे घनिष्ठ संबंध

युनायटेड फॉस्फरस लि. आणि भाजपचे घनिष्ठ संबंध

मुंबई नगरी टीम

मुंबई :  युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचा काळा धंदा काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणल्यानंतर भाजपचे आणि युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीचे संबंध किती घनिष्ठ आहेत याचे नवनविन पुरावे समोर येत आहेत. यातून या दोघांचे आर्थिक लागेबांधे आहेत हे स्पष्ट असून याची चौकशी कऱण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्षातर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या कंपनीशी भाजपच्या असलेल्या संबंधाबाबत कितीही हात झटकले तरी पियुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल हे या कंपनीचे संचालक आहेत ही वस्तुस्थिती पियुष गोयल यांना नाकारता येणार नाही. तसेच खा. संजय काकडे या कंपनी व्यावसायिक भागीदार आहेत ही वस्तुस्थिती कशी नाकारणार? परंतु त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे आणि धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर काही महिन्यातच युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या उपाध्यक्षा  सँड्रा आर. श्रॉफ यांची शासनाच्या वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्युटच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. भाजप सरकारने श्रॉफ कुटुंबियांवर ही मेहेरबानी का केली होती ? हे आता उघडकीस आले आहे असे म्हणून काँग्रेस प्रवक्ते सावंत यांनी सीबीआय चौकशीच्या मागणीचा पुनरूच्चार केला.

 

 

 

 

 

 

Previous articleउर्मिला मातोंडकरने घेतली शरद पवारांची भेट
Next articleनीलेश राणेंसह १६ जणांविरोधात गुन्हा दाखल