सत्तेत तुम्ही आणि शेतीसाठी काय केले याची उत्तरे आम्ही द्यायची
मुंबई नगरी टीम
सांगली : गेली पाच वर्षे सत्तेच्या गादीवर हे आणि शेतीसाठी काय केले याची आम्ही उत्तर द्यायची, अहो मोदी आम्ही विरोधी पक्षात आहोत याची आठवण करून देणारा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.
सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आज पार पडली त्यावेळी ते बोलत होते. शेती व शेतकऱ्यांच्या व्यवस्था उध्वस्त करतो त्याचा आम्ही विचार करणार नाही म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे असेही पवार म्हणाले.भाजपाला सत्तेची इतकी मस्ती आली आहे की,त्यांचे प्रदेशाध्यक्ष दानवे हे शेतक-यांना साले म्हणत आहेत तर दुसरीकडे प्रवक्ते अवधूत वाघ हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना लावारिस बोलत आहेत आणि हेच त्यांच्याकडे मते मागायला जात आहेत यांना मते मागायला लाज कशी वाटत नाही असा संतप्त सवालही पवार यांनी केला.
महाराष्ट्रातील सहा सभांमध्ये मोदींना शरद पवारांची आठवण आली असे झालं नाही. त्यांच्याकडे पैसा आहे जाहिरातीवर खर्च करण्यासाठी आमच्याकडे नाही त्यामुळे त्यांच्या तोंडातून माझी फुकट प्रसिध्दी होत आहे हे चांगलेच आहे.या सहा सभांमध्ये कधी सांगतात पवारांच्या घरात भांडणे सुरु आहेत तर कधी पवारांचे पुतण्याने अधिकार काढून घेतले.अहो, मोदी आमची चिंता कशाला करताय. हा एकटयादुकटयाचा राष्ट्रवादी पक्ष नाही हा जनतेच्या आशिर्वादाने उभा राहिलेला पक्ष आहे असेही पवार यांनी सांगितले.
सभेत शरद पवार यांनी विशाल पाटील या तरुणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर जनतेसमोर सादर केले आहे. जनतेची सेवा करण्याची पार्श्वभूमी या कुटुंबात आहे. या जिल्हयात आल्यावर वसंतदादा, राजारामबापूंची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अशी अनेक नावे घेता येतील ज्यांनी आपल्या जिल्हयाचे व देशाचे नाव आपल्या कर्तृत्वाने उज्ज्वल केले आहे असेही शरद पवार म्हणाले.सांगली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे नाते अतूट आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे. हा वणवा आता पेटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहून विकासाला साथ द्या असे आवाहन केले. यावेळी उमेदवार विशाल पाटील यांनीही आपले विचार मांडले. या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, उमेदवार विशाल पाटील, आमदार श्रीमती सुमनताई पाटील, कॉंग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्यासह महाआघाडीचे नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मोठया संख्येने उपस्थित होते.