गरीबी हटविण्यासाठी काँग्रेस आणि साथीदारांना हटवा
मुंबई नगरी टीम
अहमदनगर : काँग्रेस आणि त्याच्या साथीदारांनी देशाला आणि महाराष्ट्राला लुटले आहे. ते गरीबांचे आणि शेतकऱ्यांचे दुष्मन आहेत. काँग्रेसला कायमस्वरुपी हटवले तरच गरीबी कायमची दूर होईल आणि देश भ्रष्टाचारापासून मुक्त होईल, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर केली.
भारतीय जनता पार्टीचे अहमदनगरचे उमेदवार सुजय विखे व शिवसेनेचे शिर्डीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे उपस्थित होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राम शिंदे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन व खा. दिलीप गांधी उपस्थित होते.
मोदी म्हणाले की, काँग्रेस व त्याचे साथीदार पक्ष भारत व महाराष्ट्राला लुटत होते, हे विसरू नका. ते गरीब, शेतकरी, जनता यांचे दुष्मन आहेत. देशवासीयांची आकांक्षा त्यांना सहन होत नाही. काँग्रेस व त्याच्या साथीदारांना कायमस्वरुपी हटविले तरच देशातील गरीबी दूर होईल, आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होतील, भारत भ्रष्टाचारमुक्त होईल, ‘सब का साथ सबका विकास’ साध्य होईल आणि देश प्रगती करेल. त्यामुळे आपले एक एक मत जसे भाजपा एनडीएच्या समर्थनासाठी असेल तसेच ते काँग्रेस व साथीदारांना शिक्षा देण्यासाठीही हवे.
ते म्हणाले की, जम्मू काश्मीरला भारतापासून अलग करू पाहतात अशांना या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस साथ देत आहेत. काँग्रेसकडून काही अपेक्षा नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काय झाले आहे ? देशाच्या नावावर काँग्रेस सोडली होती, आता काँग्रेसशी हातमिळवणी केल्यावर तुम्हीसुद्धा विदेशी चष्म्यातून भारताकडे पाहू लागलात का ? जम्मू काश्मीरचा स्वतंत्र पंतप्रधान असायला हवा या भूमिकेबद्दल आपण कितीकाळ गप्प राहणार ? तुमच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी आहे, पण ते नाव लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी आहे का ? आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील आहात, आपल्याला झोप कशी येते ? देशातील मतदारांना विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना ते म्हणाले की, आज जग देशाला महाशक्ती म्हणून पाहत आहे. या निवडणुकीत देशासाठी निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला इमानदार चौकीदार पाहिजे की भ्रष्टाचारी नामदार पाहिजे, हिंदुस्थानचा हिरो पाहिजे की पाकिस्तानचा वकील याचा निर्णय घ्यायचा आहे.
ते म्हणाले की, कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते त्यावेळी मुंबई पुणे असे सर्वत्र बॉम्बस्फोट होत होते. सतत बॉम्ब हल्ले होते होते. त्यामध्ये सामान्य माणूस बळी जात होता. गेली पाच वर्षे चौकीदाराच्या सरकारच्या काळात बॉम्बस्फोट कोठे झाले ? या चौकीदाराने दहशतवाद पोसणाऱ्यांच्या मनात भिती निर्माण केली आहे की, एक चूकसुद्धा त्यांना महागात पडू शकते. हा चौकीदार त्यांना पाताळातूनही शोधून काढून शिक्षा देईल. आधीचे सरकार पाकिस्तानसमोर कमजोर होते. जवानांना बदला घ्यायचा होता तर सरकार घाबरले. पण चौकीदाराने जवानांना पाकिस्तानमध्ये घरात घुसून मारण्याची परवानगी दिली आहे. भारताने जगासमोर विनंत्या करणे बंद केले आहे.पाच वर्षांपूर्वी याच शहरात झालेल्या सभेपेक्षा दुप्पट संख्येने गर्दी झाल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. त्यांनी शिर्डीच्या साईबाबांना नमन केले तर आगामी रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रचारसभांना जो प्रचंड प्रतिसाद लाभत आहे, तो पाहता या निवडणुकीत गेल्यावेळेपेक्षाही अधिक मताधिक्क्याने आमचे उमेदवार विजयी होतील. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विरोधी पक्षाचे जे ओपनिंग बॅट्समन होते, ते बारावे गडी म्हणून तंबूत परतू लागले आहेत. आम्ही डॉ. सुजय विखे पाटील यांच्या रूपाने एक युवा ओपनिंग बॅटसमन उतरविला आहे. कधी कधी सर्जिकल स्ट्राईक करावे लागतात. डॉ. सुजय विखेंच्या रूपाने काँग्रेसवर मोठा सर्जिकल स्ट्राईक झाला. त्यामुळे काँग्रेस पुरती हलून गेली आहे.या भागात सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी कुकडी, तुकाई, निळवंडे टप्पा 2च्या माध्यमातून मोठी कामे केली जात आहेत. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाच्यादृष्टीने मोठे काम मोदी सरकारच्या काळात केले गेले. हा भाग सुजलाम् सुफलाम् व्हावा, असाच प्रयत्न केला गेला आणि तोच यापुढच्या काळात राहणार आहे. कर्जमाफी, पीकविमा, थेट मदत इत्यादींतून २३८४ कोटी रूपये या भागातील शेतकर्यांहना प्राप्त झाले आहेत. आज राज्यात दुष्काळी स्थिती असताना हजारो कोटी रूपये दुष्काळासाठी प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गांसाठी ८ हजार कोटी रूपये दिले गेले आहेत. सुपा-पारनेरमध्ये उद्योगांचे मोठे जाळे उभारण्यात येत आहे. युवकांच्या कल्याणासाठी, शेतकर्यांजसाठी कठोर परिश्रम केंद्र आणि राज्यातील सरकारने केले आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बाळासाहेब विखे पाटील यांनी पाण्याच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून केला.