भाजपचा खोटारडेपणा हाच काँग्रेसच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा

भाजपचा खोटारडेपणा हाच काँग्रेसच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा

मुंबई नगरी टीम

मुंबई : रोजगार निर्मिती, महागाई आणि काळा पैशाच्या मुद्द्यावर भाजपने सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली असून गेल्या निवडणुकीतील भाजपने दिलेली खोटी आश्वासने हाच या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल, असा दावा दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेस – राष्ट्रवादीचे उमेदवार  एकनाथ गायकवाड यांनी केला आहे.

अच्छे दिन आयेंगे, या घोषणेवर विश्वास ठेवून सर्वसामान्यांनी गेल्या निवडणुकीत मोदींना एक हाती सत्ता बहाल केली. मात्र गुजरातमध्ये विकासाच्या नावाखाली केलेली चापलुसी देशपातळीवर करणे शक्य न झाल्याने मोदींचे पितळ उघडे पडले. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचा मोदींनी केलेला दावा कागदावरच राहिला असून, उलट दरवर्षा लाखो लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. नोटाबंदीसारख्या घिसाडघाईने घेतलेल्या निर्णयामुळे जवळपास साडेचार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. माझ्या मतदारसंघातील एकट्या धारावीत पन्नास टक्के लघुउद्योग बंद पडले, हजारो लोक बेरोजगार झाले. याशिवाय परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याच्या मोदींच्या घोषणेची काय फजिती झाली ते अवघ्या जगाने पाहिले आहे. मोदींच्या महत्वाकांक्षी अशा मुद्रा कर्ज योजनेपैकी तीस टक्के कर्जे पहिल्या वर्षभरातच बुडीत खाती गेली आहेत. आणखी दोन तीन वर्षात मुद्रा योजनाच खड्‌ड्यात जाण्याची चिन्हे आहेत. मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या उज्वला योजनेचाही पुरता बोजवारा उडाला आहे. कारण पहिल्या सिलेंडरनंतर बहुतांश जनतेला दुसरा सिलेंडरच मिळालेला नाही. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा आकडा सर्वाधिक आहे. अवघ्या देशभरातील शेतकरी या सरकारच्या कारभारावर नाराज आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली असून लवकरच योग्य त्या उपाययोजना झाल्या नाहीत तर भविष्यात बिकट परिस्थिती उद्भवणार हे सांगण्यासाठी कोणा अर्थतज्ज्ञाची गरज नाही, असे मा. गायकवाड म्हणाले. तरीही विकासाचे दावे करणाऱ्या भाजपाची पोलखोल करून त्यांचा खोटारडेपणा मतदारांसमोर आणणे हाच काँग्रेसचा मुख्य उद्देश असून तोच आमच्या प्रचारातील मुख्य मुद्दा असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

याउलट काँग्रेसने मात्र मुंबईकरांना किमान पाचशे वर्गफुटाचे घर, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटाला वर्षाला किमान ७२ हजार रुपये, महिलांना आरक्षण, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प यासारख्या सहज शक्य होतील अशा घोषणा आपल्या जाहिरनाम्यात केल्या आहेत. आमच्या जाहिरमान्यात केलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीचा पुर्ण आराखडा तयार असून भाजपप्रमाणे काँग्रेस हवेत घोषणा करत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Previous articleआघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी
Next articleमुंलूंड गोरेगाव लिंक रोड प्रकल्प नियोजित वेळेत पुर्ण होणार