…तसाच एक सध्या “चौकीदार” देशात आहे : शरद पवार

…तसाच एक सध्या “चौकीदार” देशात आहे : शरद पवार
मुंबई नगरी टीम

जालना : तुम्ही ज्यादिवशी कर्जबाजारी झालात… देणं थकलं की तुम्हाला पदवी मिळते थकबाकीदार…परंतु काही लोकांना नको ती पदवी सांगण्याची सवय असते तसाच सध्या देशात  एक’ चौकीदार’ आहे असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी परतुरच्या जाहीर सभेत मोदींचे नाव न घेता लगावला.

आमच्या काळात शेतक-यांचे थकबाकीदार हे नाव काढून टाकले. परंतु काही लोकांना नको ती पदवी सांगण्याची सवय असते. कुणाला पद्मश्री मिळते मला स्वतःला पद्मविभुषण ही पदवी देण्यात आली आहे. निवडून दिले की तो आमदार होतो तर लोकसभेला गेला तर तो खासदार होतो या पदव्या मिळतात. परंतु तुमच्या भोवती बहुसंख्य लोकांना काही न करता एक पदवी मिळते अशी कोपरखळीही शरद पवार यांनी केली. परभणी लोकसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार राजेश वीटेकर यांच्या प्रचारार्थ आज परतुर येथे जाहीर सभा पार पडली. बुलढाणा येथे जाहीर सभा झाल्यावर दुपारी परतुर येथे शरद पवार यांची दुसरी जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांनी मोदी सरकार आणि त्यांच्या चुकीच्या धोरणावर जोरदार टिकास्त्र सोडलं.

यावेळी सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी देवू ऑनलाईन बिनलाईन असणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. त्यावेळी पवार साहेब तुम आगे बढो अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या त्यावेळी अरे थांबा आगे बढने दो असं म्हणताच हशा पिकला… तुम्हाला सरसकट कर्जमाफी मिळेल परंतु मी तुम्हाला काम करायला लावणार आहे. सरसकट कर्जमाफी झाली की, तुम्हाला नवीन कर्ज मिळेल. बी-बियाणं चांगलं घ्या असा सल्लाही  पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.

मुख्यमंत्री असताना कर्जमाफी तीनवेळा दिली हे मला माहीत नव्हते आज मला समजलं. आता काही मला मुख्यमंत्री व्हायचं नाही मात्र तुमच्या विचाराचा आणि तुमच्या पाठींब्याने सत्ता घ्यायची आहे. आणि ही सत्ता घेवून सरसकट कर्जमाफी द्यायची आहे असेही शरद पवार म्हणाले.काही मंत्री भेटले ते म्हणाले की, पवार साहेब सगळं तुमचं चांगलं आहे परंतु तुम्ही सरकारवर फार टिका करता. मी टिका करत नाही तुम्ही या देशातील कष्टकरी बांधवावर अन्याय करत असता त्यावेळी मी टिका करतो नाहीतर टिका करत नाही. आणि मी टिकाच करत असतो तर तुमचे पंतप्रधान काय बोलले ते माहित आहे ना, की ते आले एकदा बारामतीला आणि म्हणाले की, तुमच्या गावामध्ये जे काम केलं आहे ते बघायला यायचे आहे. आता नाही कसं म्हणणार, या म्हटले. आले आणि त्यांनी भाषण केलं. राजकारणात शरद पवार यांचे बोट धरुन मी आलो असं सांगितलं. तेव्हापासून माझी झोप उडाली. आता माझं बोट धरुन हे राजकारणात आले तर एवढी कटकट सुरु झालीय तर हात धरुन आले असते तर काय केलं असतं या देशाचं असा उपरोधिक टोला  पवार यांनी मोदींना लगावला.

Previous articleभाजपला पराभूत करू शकणाऱ्या सक्षम उमेदवारांना पाठिंबा द्या
Next articleराफेलचे  सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही