माझ्या सभेचा खर्च मोजण्यापेक्षा यांच्या थापा मोजा

माझ्या सभेचा खर्च मोजण्यापेक्षा यांच्या थापा मोजा

मुंबई नगरी टीम

सोलापूर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा यानी किती थापा मारल्या ते मोजा असा घणाघाती टोला त्यांनी लगावला. नरेंद्र मोदी एक चांगला पर्याय असतील असे वाटलं होते पण आता वाटू लागले आहे की यांच्यापेक्षा आघाडीचे सरकार चांगले होते अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सोलापूरात रेकॅार्ड ब्रेक सभा पार पडली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांवर निशाणा साधला. ठाकरे यांनी मोदी शहा यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांनी आजच्या सभेत मेळघाटातील हरसाल या गावाची वस्तुस्थिती समोर आणून भाजपने केलेल्या दाव्याचा बुरका फाडला.भाजपाने राज ठाकरे यांच्या सभांच्या खर्चाबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्याचाही समाचार त्यांनी आजच्या सभेत घेतला. माझ्या सभांची आणि खर्चांची चिंता करू नका त्यापेक्षा तुम्ही मारलेल्या थापा मोजा असा टोली त्यांनी  भाजपाला लगावला. त्यांनी आजच्या सभेत पुलवामा, १० टक्के आरक्षण,  एअर स्ट्राईक आदी मुद्द्यावर भाष्य केले.  दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ असे आश्वासन मोदींनी दिले होते. मग देल्या वर्षात १० कोटी रोजगार मिळाला का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. नोटाबंदीमुळे पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. एका चुकीच्या निर्णयामुळे हे घडलं आहे तरीही अच्छे दिन आले असे म्हणायचं का? सवाल  राज ठाकरे यांनी विचारला.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : 
• निवडणूक म्हणजे तुमच्या आयुष्यातील ५ वर्षं निघून जातात, आणि अशा वेळेला सत्ताधारी तुमच्यासमोर येऊन खोटं बोलतात, तुम्हाला फसवतात आणि हे का होतं? कारण निवडणूक हा विषय आपण गांभीर्याने घेतच नाही. आपण हुरळून जाऊन मतदान करतो आणि पुढे घडतं काय तर गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या!
• आमच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा , तुम्ही किती खोटं बोललात ह्याचा हिशोब आधी करा.
• मोदी म्हणाले होते की दरवर्षी २ कोटी लोकांना नोकऱ्या देऊ म्हणजे ५ वर्षांचे १० कोटी रोजगार झाले, ४ जणांचं कुटुंब त्या एका रोजगारावर असतं म्हणजे हा देशातील ४० कोटी जनतेचा प्रश्न होता … त्या नोकऱ्या दिल्या? नाही. उलट नोटबंदीमुळे ४ तर ५ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
• नोटबंदीमुळे फक्त सोलापुरात ४० हजार यंत्रमाग कामगारांच्या नोकऱ्या गेल्या.
• महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांमध्ये जर स्थानिक लोकांनाच फक्त प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच नाही. आज ग्रामीण महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार बसला आहे. आणि आपण सगळे जातीच्या चर्चांमध्ये अडकलोय. मुळात सरकारी नोकऱ्या राहिल्यात किती? जातीवरून मतं मिळवण्यासाठी आरक्षणाची आमिष दाखवत आहेत.
• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक भाजप करणार होते, ५ वर्ष झाली, कुठे आहे स्मारक?
• डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाची माझी कल्पना आहे की जगातलं सगळ्यात मोठं वाचनालय उभं करा. जगातले लोकं इथे ज्ञान घ्यायला येऊ देत तिथे, हेच खरं स्मारक असेल.
• शिवस्मारकासाठी पंतप्रधान समुद्रात गेले होते, काय झालं त्या स्मारकांचं? आमच्या महाराजांचे खरं स्मारक हे त्यांनी उभारलेले गड-किल्ले आहेत, त्यांची नीट निगा राखणे हेच खरं महाराजांचे स्मारक ठरेल.
• काय झालं मेक इन इंडियाचं? कोणाला कामं मिळाली? काय झालं स्टार्ट अप इंडियाचं? स्मार्ट सिटी यादीत सोलापूर होतं, काय झालं सोलापूरच? नाशिक मध्ये आमच्या सत्ताकाळात आम्ही उद्योगपतींच्या सहकार्याने जे उभारलं तेच भारतीय जनता पक्ष स्मार्ट सिटीच्या नावावर खपवतंय.
• हरीलसालच्या डिजिटल गावाचं वास्तव आम्ही समोर आणलं त्यावर मुख्यमंत्र्यांनी गाव डिजिटल झालंच आहे असा दावा केला. मग ‘टीव्ही ९’ ने रिपोर्ताज करून वास्तव समोर आणलं. डिजिटल गावात ४ जी टॉवर नाही, एटीएम मशीन बंद आहे, जाहिरातीतील लाभार्थी मॉडेल रोजगाराच्या शोधात गाव सोडून निघून गेलाय.
• हरिसाल डिजिटल गावाच्या जाहिरातीमधील मॉडेल मुलगा आज मी तुमच्यासमोर आणतोय. ह्या मुलाला नोकरी नाही म्हणून हा रोजगारासाठी पुण्यात आला त्याला आमच्या लोकांनी शोधून आणला.
• हरिसाल डिजिटल गावाची जाहिरात पण हरिसाल गावात शूट केली नाही. का खोटं बोलताय मुख्यमंत्री?
• राज ठाकरे हरिसालला गेलेच नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले. मग ते म्हणाले होते मी महाराष्ट्रात १ लाख २० हजार विहिरी बांधल्या, कुठल्या विहिरीवर तुम्ही पाणी काढायला गेला होतात? आज जवळपास २७००० गावं दुष्काळग्रस्त जाहीर झाली आहेत, मराठवाड्यातील लोकं दुष्काळामुळे ग्रासून वणवण फिरत आहेत.
• प्रत्येक भारतीय जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच आश्वासन हा चुनावी जुमला होता असं अमित शाह म्हणाले आणि तुम्हाला मूर्ख बनवलंय ह्यांनी.
• मोदींनी उद्योगपतींची जवळपास २.५ लाख कोटींची कर्ज माफ केली, लाज नाही वाटत धनदांडग्यांसाठी देशाला लुटताना.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ वर्षांपूर्वी जी दाखवलेली स्वप्न आहेत त्याविषयी बोलत नाहीयेत तर बोलत काय आहेत तर पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांच्या जीवावर मतं मागत आहेत, एअरस्ट्राइकच्या जीवावर मतं मागत आहेत?
• नरेंद्र मोदी नव-मतदारांना आवाहन करत आहेत की पुलवामाच्या शहिदांच्या स्मृतीसाठी मतं द्या पण त्या शहिदांच्या कुटुंबीयांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. इतका निर्लज्ज पंतप्रधान मी कधीच पाहिला नाही. ह्याच जवानांच्या बद्दल मोदी म्हणाले होते की सैनिकांपेक्षा व्यापारी हा जास्त शूर असतो.
• नवाज शरीफना लव्ह लेटर पाठवू नका असं २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बोलणारे मोदी पंतप्रधान झाल्यावर नवाज शरीफना शपथविधीला बोलावू लागले, त्यांना पाकिस्तानात जाऊन केक भरवू लागले. काय वाटलं असेल शहीद जवानांच्या कुटुंबियांना?
• नरेंद्र मोदी आधी मनमोहन सिंहांना आरडीएक्स कुठून आलं हे विचारत होते, पण आता मी त्यांना विचारतो, पुलवामात आरडीएक्स कसं आलं? आहे का उत्तर?
• हिलटरने ज्याप्रमाणे जर्मनीमध्ये केलं त्याप्रमाणेच या लोकांना देशाला न्यायचं आहे. त्यांना लोकशाही संपवायची आहे, सर्व संस्था मोडायच्या आहेत.
• अर्थकारणापासून ते सत्ताकारणांपर्यंत सगळ्या गोष्टी फक्त ८ ते १० लोकांच्या हातात राहतील अशी व्यवस्था नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना भारतात हवी आहे.आणि म्हणूनच ह्या दोघांना राजकीय क्षितिजावरून हटवलं पाहिजे. इतकंच नव्हे तर ह्यांना मदत करणाऱ्यांना देखील मतदान करू नका.
Previous articleराफेलचे  सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही
Next article‘भाभीजी घर पर है’ आणि ‘तुझसे है राब्ता’च्या निर्मात्यांना सक्त ताकीद