धर्मांध शक्तींचा पराभव करण्यासाठी सर्वसामान्य मतदार काँग्रेसच्याच पाठिशी
मुंबई नगरी टीम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यापासून मुस्लिम व दलितांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही बाब हे दोन्ही समाज विसरले नसून गेल्या पाच वर्षांत माजलेल्या या धर्मांध शक्तीला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी दलित व मुस्लीम काँग्रेसच्या पाठिशी उभे राहतील असा विश्वास दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये संपुर्ण बहुमताने भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तथाकथित धर्मरक्षकांनी कायदा हातात घेत दलित आणि मुस्लीमांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. गोमांस बाळगल्याच्या संशय असो किंवा लव्ह जिहाद, नाहीतर आंतरजातीय विवाहासारख्या क्षुल्लक कारणास्तव २०१५ सालापासून आतापर्यंत या धर्मरक्षकांनी जवळपास ९० पेक्षा अधिक जणांना मॉब लिंचींगद्वारे ठार केले आहे. उत्तरप्रदेशातील दादरी, अलिगढ, हापूड, गुजराममधील उना, राजस्थानातील अलवर, पश्चिम बंगालमधील जलपायगुडी असो किंवा बिहारमधील बेगुसराय; प्रत्येक ठिकाणी दलित आणि मुस्लिम समाजातील व्यक्तींचा हकनाक बळी गेला आहे. या अतिशय गंभीर मुद्द्यावर भाष्य करताना गायकवाड म्हणाले की, गेल्या पाच वर्षांतील ही सर्व पार्श्वभुमी लक्षात घेता मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा पराभव करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि दलित तसेच मुस्लीम समाज हा राजकीय आणि सामाजिक जाणीवा जागृत असलेला समाज आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत आपल्यावरील अन्यायाचा बदला घेण्यासाठी तसेच भाजपचा पराभव करण्यासाठीच हे दोन्ही समाज संपुर्ण ताकदीने काँग्रेसच्या पाठिशी उभे राहतील, असे ते म्हणाले.
नुकतेच काँग्रेसने एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दादरच्या शिवाजी पार्क येथे संवाद फेरीचे आयोजन केले होते. या फेरीदरम्यान मनसेच्या नेत्यांनी गायकवाड यांना भेटून निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीय मते काँग्रेसपासून दुरावतील, असे वाटत नाही का? असे विचारले असता गायकवाड म्हणाले की, मनसे हा काँग्रेस महाआघाडीचा घटक पक्ष नाही. मात्र हुकूमशाही विरोधात आमची लढाई असल्याने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढणाऱ्या काँग्रेसला आमचा पाठिंबा असल्याची भुमिका मनसेने मांडली आहे. आणि धर्मांध शक्ती व भाजपच्या हुकूमशाही प्रवृत्तीला विरोध करणाऱ्यांचे स्वागत करण्यात कोणतीही चूक आहे असे आपणास वाटत नाही. मतदारांनाही आपल्या आसपास काय सुरू आहे हे पक्के ठाऊक असल्याने या भुमिकेला ते विरोध करणार नाहीत, असा मला विश्वास असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.