गजाभाऊंना विजयी करून मोदींचे हात बळकट करा
मुंबई नगरी टीम
मुंबई : हि निवडणूक मुंबईच्या विकासाची आहे तशी ती राष्ट्रीय अस्मितेची आहे, राष्ट्रीय सुरक्षिततेची आहे. गेल्या ५ वर्षात मुंबईत एकही बॉम्बस्फोट नाही, दंगल नाही, नरेंद्र मोदींच्या हाती ती सुरक्षित आहे. सर्जिकल स्ट्राईकला फर्जीकल स्ट्राईक म्हणणा-या आणि आपल्या सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणा-या उमेदवाराला मतदारांनी त्याच्या कर्तृत्वाविषयी प्रश्न विचारावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गजाभाऊंना विजयी करून नरेंद्र मोदींचे हात बळकट करा. गजाभाऊ दिल्लीत तर वाचाळवीर गल्लीत बसणार आहे असा आत्मविश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
मला आनंद होतो आहे की, जमिनीवर काम करून नेतृत्व उभे करणारे, एक शिवसैनिक म्हणून महाराष्ट्राची सेवा करणारे खा. गजानन कीर्तिकर आहेत. खासदार असावा तर गजाभाऊंसारखा कारण सर्वात जास्त संसदेत प्रश्न विचारणा-या देशातील ५ खासदारांत गजाभाऊ आहेत. सामान्य माणसाचे प्रश्न संसदेत मांडणारे गजाभाऊंसारखे खासदार संसदेत हवेत. देशाचा मान-सन्मान सुरक्षित ठेवण्याचा निर्णय करणारी हि लोकसभा निवडणूक आहे. तेव्हा महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुभाषनगर, एम.आय.डी.सी.,अंधेरी (पूर्व) येथील कीर्तिकरांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केले.
कॉंग्रेस गरीबी हटवू शकत नाही, उधारीचा वायदा आहे. कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कोंबडी विकण्याचा धंदा आहे, खोटे आश्वासन आहे. ५५ वर्षात कॉंग्रेसने अनाचार, भ्रष्टाचार, दुराचार याची मालिका सुरू ठेवली तर ५ वर्षात मोदी सरकारने शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवणा-या योजना सुरू केल्या. प्रधानमंत्री आवास योजना, जनधन योजना, उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत योजनांमुळे देशातील लाखो गरीब जनतेला लाभ झाला आहे. मुंबईतील २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना ३०० चौ.फूटाचे घर मिळणार आहे तर मुंबईतील ५०० चौ.फूटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ झाला आहे. यात काही त्रुटी असतील त्या आमचे सरकार दूर करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आणि मुद्देसूद भाषण करणारे मुख्यमंत्री आहेत असे कौतुक करून समर्थपणे ते महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहेत असे सांगितले. मी खासदार निधी ४६.५० कोटी रूपये विकासासाठी खर्च केला. रेल्वे प्रवाश्यांना सेवा-सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले. केंद्रीय विद्यालय, एम्ससारखे सुसज्ज हॉस्पिटल आणण्याचे मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आपले सहकार्य लाभावे. तुम्ही,उद्धवजी आणि आठवले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून खासदारांचा मोठा वाटा जाईल असे खात्रीने कीर्तिकर यांनी सांगितले.
या सभेस राज्यमंत्री रविंद्र वायकर, विद्या ठाकूर, आमदार अनिल परब, आमदार अमित साटम, आमदार सुनिल प्रभू, आमदार रमेश लटके, आमदार भारती लव्हेकर, माजी आमदार राजहंस सिंह, रिपाईचे प्रकाश जाधव, भाजपाच्या सरीता राजपुरे, रासपचे मनिष पटेल आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.