४३ डिग्री तापमानात पंकजाताई पोहोचल्या छावणी अन बांधावर !
मुंबई नगरी टीम
बीड : ४३ डिग्री रणरणत्या उन्हात सूर्य आग ओकत असतांना राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे ह्या जिल्हयातील शेतक-यांसाठी धावून गेल्या. सध्या कुठलेही मतदान नसतांना राजकारण सोडून त्यांनी चारा छावणी आणि बांधावर जावून दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. जनावरांना आणि जनतेला पाण्याची टंचाई कमतरता भासू देणार नाही असे सांगतानाच बीड जिल्हयाला दुष्काळातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी उपाय योजना करणार असल्याचे त्यांनी विविध ठिकाणी शेतक-यांशी संवाद साधतांना सांगितले.
पालकमंत्री पंकजा मुंडे ह्या जिल्हयाच्या दुष्काळी दौ-यावर असून आज त्यांनी तांबा राजूरी, आवळवाडी, रायमोहा, खोकरमोहा, तळेगांव, आहेरवडगांव, मांजरसुंबा, चौसाळा आदी ठिकाणी जनावरांच्या चारा छावण्यांना भेटी देऊन तेथील शेतक-यांशी संवाद साधला. भर उन्हात ४३ डिग्री तापमान असतांना प्रत्येक छावणीवर तसेच बांधावर जावून तेथील परिस्थितीची तसेच छावण्यावर असलेल्या सुविधांची त्यांनी पाहणी केली. झाडाखाली बसून शेतक-यांशी संवाद साधला.
जिल्हयातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे मागील वर्षी पेक्षा यंदा छावण्यांची संख्या ८५० एवढी राज्यात सर्वाधिक झाली आहे, छावण्यांचा उपयोग जास्तीत जास्त शेतक-यांनाच व्हावा यासाठी सरकारने नियम केले आहेत. छावणी चालकांना देखील छावण्या चालविताना चारा, पाणी व अन्य सुविधा देण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्यामुळे त्यांची आर्थिक अडचण लक्षात घेवून त्यांच्या निधीचा मुद्दा आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला होता, लवकरच निधीची तरतूद होईल असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
बीड जिल्हयात सातत्याने दुष्काळ येतो. हा जिल्हा सर्वाधिक विमा मिळविणारा जिल्हा असला तरी ही बाब आनंदाची नाही. सध्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जादा टॅकर देणे हाच पर्याय आहे पण कायमस्वरूपी टंचाईवर मात करण्यासाठी ३२ हजार कोटीचा वॅाटरग्रीड प्रकल्प आणि कृष्णा खो-याच्या पाण्याचा आपल्या भागाला फायदा होणार आहे, तसे प्रयत्न सरकारच्या माध्यमातून आपण करत आहोत. पुढील सात वर्षात जिल्हयाला बंद पाईपमधून पाणीपुरवठा होणार असल्याने पाऊस नसला तरी जिल्हयाला पाणी मिळेल. भविष्यात सर्वाधिक विमा घेणारा जिल्हा अशा पुरस्काराऐवजी उपाय योजना करून सुजलाम् सुफलाम् जिल्हा असा पुरस्कार आपल्याला मिळवायचा आहे असे त्या म्हणाल्या.
चारा छावणीत बोगसगिरी चालणार नाही परंतु यात कांही जण राजकारण करून आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे असे राजकारण करून कोणी विनाकारण छावणी चालकाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सहन करणार नाही, माझ्या माणसांच्या मागे मी खंबीरपणे उभी आहे असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. एवढा महिना आपल्याला सहन करायचे आहे, यंदा चांगला पाऊस पडावा आणि बळीराजा संकटातून बाहेर यावा अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
पंकजा मुंडे यांनी खोकरमोहा येथे चारा छावणीला भेट दिल्यानंतर तेथील शेतक-यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. एवढेच नव्हे तर मंत्री पदाचा बडेजाव बाजूला सारून पशूधन पालक व शेतक-यांनी आणलेल्या शिदोरीचा त्यांच्या समवेत बसून आस्वाद घेतला. पंकजाताईंनी अगदी सर्व सामान्यांप्रमाणे भाजी-भाकरी आस्वाद घेतल्याने उपस्थित शेतकरी लोकनेते मुंडे साहेबांच्या आठवणीने भारावून गेले. चारा छावण्यांच्या भेटीच्या वेळी महिला भगिनींची ठिक ठिकाणी लक्षणीय उपस्थिती होती. आवळवाडी रायमोहा येथे छावणीला भेट देऊन परत निघताना एका आजीबाईला पंकजाताईंना भेटून गहिवरून आले. त्यांनी तुमच्यासाठी एक ओवी गाऊ का? अशी विनंती केली. पंकजाताई यांनी हो म्हणताच आजीबाईने ओवीतून त्यांना आशीर्वाद दिले.