पालक सचिवांनी जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबतचे अहवाल येत्या २१ मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही पालक सचिवांना देण्यात आले आहेत.
राज्यातील यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी व टंचाई आराखड्याचे नियोजन यांची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्यात भेट देऊन तपशीलवार आढावा घ्यावा, त्याचा सविस्तर अहवाल मुख्य सचिवांमार्फत २१ मे २०१९ पर्यंत सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.