पंकजाताईंनी पाणी वर्ज्य करणा-या संजय विडेकर यांच्या पत्नी मुलीला दिला धीर
मुंबई नगरी टीम
परळी : पाणी भरण्याच्या धडपडीत वीजेचा शॅाक लागून मृत्यूमुखी पडलेल्या शहरातील संजय विडेकर यांच्या कुटुंबियांची राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज भेट घेवून त्यांच्या पत्नी व मुलीला धीर देऊन त्यांचे सांत्वन केले. दरम्यान, पाणी टंचाईचा बळी जाण्यास कारणीभूत ठरलेल्या नगरपरिषदे विरूध्द नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहराच्या हालगे गल्लीतील संजय विडेकर यांचा शुक्रवारी पाणी भरण्याच्या धडपडीत वीजेचा शॅाक लागून मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी होती. सध्या शहरात तीव्र पाणी टंचाई आहे, दहा दिवसाआड नळाला पाणी येत असल्याने रहिवाशांचे मोठा त्रास सहन करावा लागत आहे, त्यातच नगरपरिषदेचे पाणी वाटपात ढिसाळ नियोजन असल्याने नागरिकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे, याचाच परिणाम म्हणून पाणी भरण्याच्या धडपडीत विडेकर यांचा मृत्यू झाला.
ही घटना समजताच पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी हालगे गल्लीत जाऊन विडेकर कुटूंबियांची भेट घेतली. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने विडेकर यांच्या पत्नी सुनिता व मुलगी सोनालीने पाणी पिणे वर्ज्य केले होते, रहिवाशांनी त्यांना खूप समजावून सांगितले पण पाण्यामुळेच आपला पतीचे प्राण गेले या भावनेने त्यांनी पाणी पिणे बंद केले होते, अखेर पंकजा मुंडे यांनी त्यांचे सांत्वन करत धीर दिला व स्वतःच्या हाताने पाणी पिण्यास देऊन वेदनेवर फुंकर घातली.
पंकजा मुंडे यांच्या वतीने वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते विडेकर कुटूंबियांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नगरसेवक पवन मुंडे, राजेंद्र ओझा, सचिन गिते, मोहन जोशी, नितीन समशेट्टे, योगेश पांडकर, प्रशांत कराड, प्रितेश तोतला, गिरीश नरवणे, गजानन हालगे, विशाल उदगीरकर आदी उपस्थित होते.