नदी असलेल्या गावांमध्येही पाण्याचे टँकर सुरू करा

नदी असलेल्या गावांमध्येही पाण्याचे टँकर सुरू करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : सातारा जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. गावातून नदी गेली आहे परंतु, त्याला पाणी नसेल अशा ठिकाणीही मागणीनुसार पाण्याचे टँकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनास दिले. कायम दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजनांचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सरपंचांना दिले.

मुख्यमंत्री  फडणवीस यांनी आज ऑडिओ ब्रिजच्या प्रणालीद्वारे सातारा जिल्ह्यातील प्रामुख्याने माण-दहिवडी, खटाव, फलटण व कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. सरपंचांनी केलेल्या चारा छावण्या, टँकर, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी बाबींच्या तक्रारींची तसेच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉटसअपवर येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी दिले. यावेळी फलटण तालुक्यातील रणजित निंबाळकर, शिंदे, चित्रा काकडे, माण तालुक्यातील प्रशांत गोरड, पारूबाई चव्हाण, सुशीला नामदेव चव्हाण, मनिषा सोंड, धनाजी हावळे,  गौरी नारायण शिंदे, श्रीमती अवताडे, कोरेगाव तालुक्यातील शशिकला शेंडगे, जेधे, गणेश जगताप, शैला मडके, नयनेश कांबळे, सुभाष पिसाळ, स्वाती नवनाथ पोकळे, आशाताई फसगुडे, फलटण तालुक्यातील मंदा परशुराम फरांदे यांच्यासह सुमारे वीस सरपंचांशी मुख्यमंत्री  फडणवीस यांनी मोबाईलद्वारे संवाद साधला.

 फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सध्याची स्थिती पाहून चारा छावणी, टँकर पुरवठा, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी तातडीच्या उपायांवर भर द्यावा. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना नाहीत, अशा ठिकाणी या योजना सुरू करण्यासंदर्भातील अहवाल तयार करावे. टँकरची मागणी असल्यास पाहणी करून तहसीलदारांनी तत्काळ प्रस्ताव मंजूर करावेत. जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणी पुरविण्यात यावे. सिंचन विहिरी अथवा तलावामधील पाण्याच्या स्त्रोताचा वापर करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे अहवाल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कार्यवाही करावी.

पाणी पुरवठा योजनांना नियमित विद्युत पुरवठा होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. तसेच पिण्याच्या पाणी पुरवठ्यास प्राधान्य द्यावे. तलाव अथवा पाण्याच्या स्त्रोताच्या ठिकाणी अन्य बाबींसाठी पाण्याची मोटार लावू देऊ नये, अशा सूचनाही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी दिल्या.कायम दुष्काळी भागात उपाय योजण्यासाठी सरपंचांनी गावाचे प्रस्ताव पाठवावेत. त्यावर दीर्घकालीन उपाय योजना राबविण्याचा विचार करण्यात येईल. पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण करून त्याबाबतची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अकरा पैकी माण-दहिवडी, कोरेगाव, फलटण या तीन तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमधील १८३ गावे व ७७० वाड्या-वस्त्यांमध्ये एकूण २१९ टँकर सुरु आहेत. सर्वाधिक माण तालुक्यात १०७ तर सर्वात कमी सातारा तालुक्यात एक टँकर सुरू आहे.

Previous articleकाँग्रेसचे पथक दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यावर!
Next articleसरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही