विजयाचा उद्देश हा नाही की कोण अमर झाला आहे : नवाब मलिक
मुंबई नगरी टीम
मुंबई: भाजपाचा विजय निश्चित झाला आहे. परंतु विजयाचा उद्देश हा नाही की कोण अमर झाला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपला त्यांना मिळालेल्या विजयावर खडेबोल सुनावले आहेत.
भाजप-शिवसेनेकडे विजयाचा अहंकार निर्माण झाला आहे. मतांच्या विभाजनांचा लाभ मिळाला आहे. बालाकोटच्या मुद्द्यावर मते मागण्यात आली. लोकांनी दिलीही परंतु आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी इम्रान खान यांच्याशी मधुर संबंध बनवायला निघाले आहेत असा जोरदार टोला मलिक यांनी लगावला. जसजसा वेळ निघून जाईल त्यानंतर बालाकोट आणि पुलवामाची सत्यता लोकांसमोर येईल. मोदी घरात घुसून मारण्याची भाषा करत होते मात्र आता मधुर संबंध जोडू लागले आहेत हे जनता बघत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.लोकसभेत जे यश मिळाले तेच यश विधानसभेत मिळेल ही शक्यता कमीच आहे असेही मलिक यांनी ठामपणे सांगितले.
शरद पवार यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्यात आली असून, दोन दिवसात वेळ मिळेल त्यावेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी का द्यायला हवी हे पवार हे मुख्यमंत्र्यांना समजून सांगणार आहेत अशी माहिती मलिक यांनी दिली.महाराष्ट्रात मोठया प्रमाणात दुष्काळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सतत दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे असेही मलिक म्हणाले.चारा छावण्या असतील किंवा जनावरांना पाण्याची व्यवस्था असेल याकडे सरकारने पाहिजे तसा लक्ष दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या बागा सुकल्या आहेत. या बागा सुकल्यामुळे येणार्या काळात त्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे.त्यामुळे सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी पक्षाची असेही मलिक यांनी सांगितले.