काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून फोनाफोनी
मुंबई नगरी टीम
मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत काँग्रेसचे अनेक आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज खळबळजनक आरोप केला आहे. काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्री खटाटोप करीत असून, अनेक आमदारांना ते फोन करीत आहेत. मात्र आता कोणीही पक्ष सोडेल, असे वाटत नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठकींचे आयोजन केले होते.महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे झालेल्या या बैठकीला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आ. बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आदी नेते उपस्थित होते.या बैठकीमध्ये प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीचे निकाल, राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थिती, दुष्काळ व इतर प्रश्न, त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या बैठकींसाठी जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते.विधानसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांशी चर्चा सुरू करण्यापूर्वी काँग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी या बैठकींचे आयोजन केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
या बैठकीनंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला.मुख्यमंत्री फडणवीस आणि काँग्रेस सोडून गेलेले नेते फोन करून काँग्रेस मधिल नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करीत आहे असे चव्हाण म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकताच विरोधीपक्ष नेतेपदाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी हा आरोप केल्याचे म्हटले जाते. लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक मतदारसंघात अपेक्षित मदत केली नसल्याची तक्रार काही पदाधिकाऱ्यांनी आज झालेल्या बैठकीत केल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले म्हणून भारतीय जनता पक्षाने हुरळून जाण्याची गरज नाही. या सरकारवर लोक नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगवेगळे असू शकतात, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही तेच दिसून येईल, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आघाडी शिल्लक ठेवणार नाही, या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानाचाही त्यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. लोकसभेचा एक विजय मिळाला म्हणून विखे पाटील यांनी फाजील आत्मविश्वास बाळगणे योग्य नसल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला. निवडणूक आली की शिवसेनेला राम मंदिराची आठवण होते. आता विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्याने उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर निघाल्याचेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला. संघाकडून घेण्यासारखं काहीही नाही. काँग्रेस पक्ष नेहमी संघाशी संघर्ष करीत आला आहे. आम्ही कधीही संघाचं अनुकरण करणार नाही, चव्हाण म्हणाले.