चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट हे लोकसभा निवडणूकीत विजयी झाल्याने त्यांनी आमदारकीचा आणि मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने पुण्याचे पालकमंत्रीपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
जळगाव आणि पुणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलण्यात आले असून, गिरिश बापट यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज या दोन खात्यांची जबाबदारी अन्य मंत्र्यावर सोपवण्यात आली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी जयकुमार रावल यांच्यावर तर संसदीय कामकाज खात्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.तर बापट यांच्याकडे असेलेले पुण्याचे पालकमंत्रीपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे.यापूर्वी पाटील हे जळगावचे पालकमंत्री म्हणून कार्यरत होते. जळगावच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. हा विस्तार येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होवू शकतो.मुख्यमंत्री फडणवीस यांनी कालच्या दिल्ली दौ-यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत फडणवीस यांनी संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा केल्याचे समजते.प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे लोकसभा निवडणूकीत विजयी झाल्याने त्यांच्या जागी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड करावी याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसचा आणि विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रीमंडळ विस्तारात समावेश होण्याची शक्यता आहे तर शिवसेनेकडूनही एकाचा या विस्तारात समावेश केला जावू शकतो.