भाजपामधील असंतोष शमविण्यासाठी मंत्रीमंडळ विस्ताराचे गाजर

भाजपामधील असंतोष शमविण्यासाठी मंत्रीमंडळ विस्ताराचे गाजर

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : राज्य मंत्रीमंडळात फेरबदल झालाच तर तो सरकारच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी नव्हे तर केवळ भाजप आमदारांमध्ये असंतोष शमविण्यासाठी असेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

टिळक भवन येथे आयोजित पदाधिका-यांच्या जिल्हानिहाय बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वक्तव्य केले. मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे नविन मंत्री नेमले तरी ते फारसा प्रकाश पाडू शकणार नाहीत. सरकारच्या साडेचार वर्षाच्या कारभारावर केवळ जनताच नव्हे तर सत्ताधारी पक्षाचे आमदार देखील नाराज आहेत. त्यामुळे आम्ही काही तरी नविन करतो आहोत आणि सरकारचा चेहरा मोहरा बदलतो आहोत असे चित्र उभे करण्यासाठी व पक्षांतर्गत असंतोष शमविण्यासाठी विस्ताराचे चॉकलेट दिले जात आहे असे चव्हाण म्हणाले.
काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या दाव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस पक्षातील आमदार विचारधारेशी एकनिष्ठ असून भाजपने कितीह प्रयत्न केले तरी आणखी कोणीही आमदार भाजपमध्ये जाणार नाही. मात्र भाजपला सत्तेची धुंदी चढल्यामुळे ते अशा प्रकारे विरोधी पक्ष फोडण्याची विधाने करीत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

आज दिवसभर झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी विदर्भातील पदाधिका-यांशी चर्चा केली. यावेळी लोकसभा निवडणुकीचे निकाल, संबंधित जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व समस्या तसेच आगामी निवडणुकीच्या रणनितीच्या अनुषंगाने विचार विनिमय करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस कार्यसमिती सदस्य आ. बाळासाहेब थोरात,विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. नसीम खान, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री जयवंतराव आवळे,  कृपाशंकर सिंह, खा. हुसेन दलवाई, आ. शरद रणपिसे, आ. बसवराज पाटील, आ. अमित देशमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन नाईक, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, आ. भाई जगताप, आ. के. सी. पाडवी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जयप्रकाश छाजेड, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, सचिन सावंत, पृथ्वीराज साठे, अभिजीत सपकाळ,रामकिशन ओझा आदी उपस्थित होते.

Previous articleदक्षिण कोकणात १४ जूनपर्यंत मान्सून दाखल होणार
Next articleआज देशात सांप्रदायिक विचाराचा ज्वर पहायला मिळत आहे