आज देशात सांप्रदायिक विचाराचा ज्वर पहायला मिळत आहे
मुंबई नगरी टीम
मुंबई : देशात आणि संसदेत आज सांप्रदायिक विचाराचा ज्वर पहायला मिळत असून, समाजाला एकसंघ न ठेवणारी विखारी पद्धत सध्या संसदेत पाहायला मिळत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या २० व्या स्थापना दिवशी आयोजित केलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. सध्याच्या संसदेत भगवे विचार मांडणाऱ्या लोकांची संख्या जास्त असेल. त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे खटले असणारे लोक असणार आहेत. त्यामध्ये मालेगाव बॉम्बस्फोटामधील आरोपीही आहेत असे स्पष्ट करून त्यांच्यावर गंभीर खटले आहेत अशांना उमेदवारी देणे ही लोकशाहीत गंभीर बाब आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली.जनतेच्या प्रश्नावर काढलेले मोर्चे आणि आंदोलनात असलेले खटले हे सन्मानचिन्ह आहे. मात्र खुनाचा आरोप ,मालेगाव बॅाम्बस्फोटातील खटले असलेले व्यक्ती संसदेत असणार आहेत असेही पवार म्हणाले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अल्पसंख्यांक समाजाची मुले पकडण्यात आली. ही बाब मला समजली नाही. नमाज सुरु असताना त्याच समाजातील मुले मशिदीमध्ये बॉम्बस्फोट करतील यावर माझा विश्वास बसला नाही असे पवार यावेळी सांगून,राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी असणाऱ्या एक भगिनी आमच्या शेजारी बसणार आहेत असा टोला पवार यांनी लगावला.
राष्ट्रवादीच्या स्थापनेला २० वर्ष होवून गेली या काळात बरीच स्थित्यंतरे होवून गेली. महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या मंत्रीमंडळात संधी मिळाली. पक्ष स्थापन झाल्यावर सत्तेत येणारा राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष होता हे तुमच्यामुळे घडले असेही पवार म्हणाले. सत्ता आल्यावर पक्षाचा पाया व्यापक करण्याचे काम आपण केले. संघटनात्मक विस्तार वाढवत असतानाच सत्तेतील लोकही लोकांची कामे करत होते. त्यामुळे काम करुन घ्यावे ते राष्ट्रवादीकडून हे चित्र राज्यात आपल्या पक्षाचे होते असेही पवार यांनी सांगितले. देशाच्या पंतप्रधानांनी गुहेत जावून बसून काय संदेश दिला. विज्ञानाच्या आधारे आधुनिक विचार केला जातो मात्र आपले पंतप्रधान गुहेत जावून बसतात हे योग्य नाही असा टोला पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला. मुंबईत पक्षाचा विस्तार वाढवायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेस फक्त ग्रामीण चेहरा बनवला गेला आहे. तो असणारच परंतु प्रत्येक तालुक्यात नागरीकरण झालेले आहे. ५० टक्के लोकसंख्या नागरीकरणात आली आहे. नागरी परीसरात पक्षाची व्याप्ती कशी वाढेल याकडे लक्ष द्यायला पाहिजे असे सांगून, नागरी प्रश्नासाठी संघर्ष करून या लोकांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे असे पवार यांनी स्पष्ट केले.
पक्षाची सत्ता असताना तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्याकडे होता. आज ही तरूण आणि नवी पिढी, किती प्रमाणात आपल्याकडे आहे असा प्रश्न उपस्थित करून या तरुणपिढीकडे लक्ष दिले नाही त्यांची काळजी नाही घेतली नाही तर काय होईल याचा विचार पक्षात व्हायला असेही पवार म्हणाले. यापुढे तरुणांना संधी देण्याची गरज असून, लोकांना बदल हवा असतो. अनुभवी लोकांसोबत तरुणांची संख्या पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा तरुण पिढी हवी. त्यामुळे आतापासूनच निवडणूकांची तयारी करायला लागा असे आवाहन पवार यांनी केले. आज समाजमाध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोचता येते. याचा आधार घेण्याची गरज आहे असे सांगून त्याकडे लक्ष दिले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादाचा प्रखर विचार मांडून पाकिस्तानाला लक्ष्य केंद्रीत केले परंतु हे देशहिताचे नव्हते. लोकांच्या मनात राष्ट्रहित जपले पाहिजे ही भावना त्यामुळे निर्माण झाली. ती रुजवण्यात भाजप यशस्वी झाले असेही पवार म्हणाले.पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची भाषा करणारे मोदी सत्ता आल्यानंतर गुहेत गेले . जग पालथे घालण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.