शिक्षकांच्या उपोषणावरून सत्ताधारी विरोधक भिडले
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभेत आज आझाद मैदान येथे उपोषणास बसलेल्या शिक्षकांच्या उपोषणाच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार तू-तू, मै,मै झाले, उपोषणास बसलेल्या शिक्षकांना पोलीस सायंकाळी ६ वाजता हाकलून देतात, अशी माहिती काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी सभागृहात दिली. पोलिसांनी दिलेल्या या वागणुकीवर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आक्रमक झाले. त्यांच्या एका संतप्त उल्लेखावरून सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिक्षकांच्या प्रश्नावर सरकारने निवेदन करावे या मागणीसह आंदोलनकर्त्यांना तेथून हटविण्याचे पोलिसांना काय अधिकार ? त्यातही एका मंत्र्याच्या शिक्षक भगिनीला पोलीस दंडुकेशाहीच्या जोरावर अशी वागणूक कशी देतात, असे प्रश्न उपस्थित करून पोलीसांसंदर्भात आक्रमक पवित्रा आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतला. त्यावर मंत्री रामदास कदम यांनी असे शब्द वापरने योग्य नाही असे सांगत हे शब्द कामकाजातून वगळ्याची विनंती केली. वड्डेटीवार विरोधी पक्ष नेते होणार आहात, तेव्हा असे शब्द वापरणे आपल्याला शोभत नाही, असेही कदम म्हणाले.आघाडी सरकारच्या १५ वर्षांतील कारभारामुळे हे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत असा टोला मंत्री जयकुमार रावळ यांनी लगावल्यावर विरोधक संतापले. सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू झाली. विरोधक अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत गोळा झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी रावल यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. सभागृहातील तणाव पाहून मंत्री रामदास कदम यांनी या चर्चेत हस्तक्षेप केला. आझाद मैदानावर जाऊन आंदोलकांची भेट घेऊ, असे सांगितल्यानंतर सभागृहातील वातावरण शांत झाले.त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये काही वेळ वादावादी झाली. त्यानंतर पिठासीन अध्यक्षांनी यावर सरकारने निवेदन करावे असे सांगून वादावर पडदा टाकला.